Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या
 
 
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले. त्यांचे अनेक सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यातीलच त्यांचा एक सिनेमा म्हणजे धुमधडाका. या सिनेमातील अनेक सीन खूप गाजले. धुमधडाका सिनेमातील अशोक सराफ यांनी साकारलेलं यदुनाथ जवळकर हे कॅरेक्टर खूप गाजलं. त्याच्या तोंडी असलेला वॅख्या विख्खी वुख्खु हा डायलॉग खूप गाजला. या सिनेमात त्यांची जोडी अभिनेत्री सुरेखा म्हणजेच ऐश्वर्या राणे यांच्यासोबत जमली होती. सुरेखा यांनी या सिनेमात सीमा वाकडे ही भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं प्रियतमा हे गाणं खूप गाजलं होतं. त्यानंतर सुरेखा यांना अनेकजण प्रियतमा म्हणूनही ओळखू लागले. सुरेखा यांनी बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं.


शराबी, मर्द, भन्नाट भानू, नमक हलाल, भटक भवानी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या सिनेविश्वपासून दुरावल्या. त्याचं कारण ठरलं एक अपघात. मर्द सिनेमात अमृता सिंगच्या बॉडी डबलचं त्या काम करत होत्या. त्यावेळी एका शॉटमध्ये त्या घोड्यावरून पडल्या आणि त्यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना काम मिळणं बंद झालं. त्यांचा झालेला अपघात इतका जबरदस्त होता की त्यांना दुबईला ट्रीटमेंट घ्यावी लागली. या उपचारांसाठी त्यांनी त्यांचं मुंबईमधील राहतं घर विकलं. त्यांच्या शरीराला जबरदस्त दुखापत झाली होती. यातून बऱ्या होण्यात बराच काळ गेला. मधल्या काळात इंडस्ट्रीसकट नातेवाईकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली.

पण त्या चर्चेत आल्या काही वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने c ग्रेड कलाकरांना मिळणारी पेन्शन त्यांना दिली जायची. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. मंत्रालयातून त्या हयात आहेत की नाही विचारण्यासाठी फोन आल्याने त्या घाबरून मंत्रालयात गेल्या होत्या. तर पेन्शनवर उदरनिर्वाह होत नसल्याने मंदिरात भीक मागण्याचीही वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्या मुलाखतीनंतर परत त्या कुणाच्याही संपर्कात नाही. त्यामुळे सध्या त्या काय करतात याविषयी कुणालाही काहीही माहित नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.