कुपवाड ड्रेनेज योजनेत घोटाळा; मंगेश चव्हाण, झालेल्या कामापेक्षा अधिक बिले दिली कुपवाड ड्रेनेज योजनेत घोटाळा
सांगली : महानगरपालिकेच्या कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम सध्या भ्रष्टाचाराच्या आणि नियोजनाच्या अभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. २०६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आतापर्यंत १४० कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात केवळ ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या कामासाठी कंत्राटदाराला अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा घाट घातला जात आहे. श्री चव्हाण म्हणाले, ''नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसले ही योजना २०६ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरीनंतर सुरू झाली, जी ९.५१ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली होती. कामाचा वेग अत्यंत संथ असूनही आतापर्यंत १४० कोटी रुपये कंत्राटदाराला आदा करण्यात आले आहेत. काम पूर्ण नसतानाही वाढीव ५० कोटी रुपयांची मागणी कंत्राटदाराकडून होत असून, ती मंजूर करण्याची तयारी सुरू आहे. जानेवारी २०२३ मध्ये मंजूर झालेल्या या योजनेची मुदत गेल्या जानेवारी महिन्यातच संपली आहे.आता ही मुदतवाढ मिळविण्यासाठी विषय महासभेसमोर आणण्याची शक्यता आहे. आमची भूमिका इतकीच आहे की, नियमांप्रमाणे आधी खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत. त्याशिवाय मुदतवाढ नको. ड्रेनेजच्या कामामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत. निविदेतील अटींप्रमाणे डांबरीकरण केले जात नाही, तोपर्यंत कंत्राटदाराला मुदतवाढ देऊ नये. सध्या केलेले पॅचवर्क हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि चुकीचे असून, ते नागरिकांच्या जीवाशी खेळणारे आहे. ते म्हणाले, ''या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी श्वेतपत्रिका काढा, वास्तव लक्षात येईल. केवळ कागदावर काम दाखवून बिले काढण्यापेक्षा, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे. पाहणी केल्यास या योजनेत झालेला मोठा घोटाळा आणि कामाच्या दर्जाबाबतचे सत्य समोर येईल.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.