कॉर्पोरेट जगात कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी बोनस किंवा वेतनवाढ दिली जाते, पण केरळमधील एका रिअल इस्टेट कंपनीने आपल्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त जे केले, त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. केरळमधील दिग्गज 'हायलाईट ग्रुप'ने आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांना तब्बल २० कोटी रुपयांच्या ४७ आलिशान कार भेट म्हणून दिल्या आहेत.
ताफ्यात रेंज रोव्हर आणि ऑडीचा समावेश
कंपनीने दिलेल्या या भेटींमध्ये केवळ सामान्य कार नाहीत, तर जगभरातील महागड्या ब्रँड्सचा समावेश आहे. रेंज रोव्हर, ऑडी क्यू-८ आणि लँड रोव्हर डिफेंडर यांसारख्या अतिमहागड्या गाड्यांचा यात समावेश आहे. याशिवाय टाटा हॅरियर, किया सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा आणि स्कोडा कायलक यांसारख्या लोकप्रिय कारदेखील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
'तीन दशकांच्या योगदानाचा सन्मान'
कंपनीचे अध्यक्ष पी. सुलेमान यांनी या निर्णयाबाबत भावना व्यक्त करताना सांगितले की, "गेल्या ३० वर्षांपासून केरळमध्ये आधुनिक स्पेस निर्माण करण्याच्या आमच्या प्रवासात या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या कामाचा नसून त्यांच्या निष्ठेचा आहे." १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने केरळमधील पहिला संघटित रिटेल स्पेस 'फोकस मॉल' उभारला होता.
६८० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आणि २ लाख नोकऱ्य
हायलाईट
ग्रुप केवळ कार भेट देऊन थांबलेला नाही, तर त्यांनी भविष्यातील विस्ताराचे
मोठे नियोजन केले आहे. कोझिकोडमध्ये १२.५ दशलक्ष स्क्वेअर फूटचे जागतिक
व्यापार केंद्र उभारले जात असून, त्यात ५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली
जाणार आहे. कंपनीने २०३० पर्यंत ५० दशलक्ष स्क्वेअर फूट विस्तार करण्याचे
उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे केरळमध्ये २ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण
होतील, असा विश्वास सीईओ अजिल मुहम्मद यांनी व्यक्त केला.
कंपनीची व्याप्ती
कंपनीत सध्या १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहे. कंपनीकडे रिटेल, कमर्शियल, निवासी आणि आयटी क्षेत्रातील मोठे प्रोजेक्ट्स असून सध्या १० नवीन मॉल्सवर काम सुरू आहे. ही एक खाजगी कंपनी असून ती शेअर बाजारात सूचिबद्ध नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.