Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोणीकंदच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन; कोल्हापुरातील मूळगावी होणार अंत्यसंस्कार

लोणीकंदच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन; कोल्हापुरातील मूळगावी होणार अंत्यसंस्कार


वाघोली (पुणे) : लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते. शनिवारी रात्री १० वाजता ते ड्यूटी संपवून वडगावशेरी येथील घरी गेले. मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लोणीकंद पोलिस ठाण्याचा त्यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पदभार स्वीकारला होता.

पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या नियोजनाची व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांनी सलग दोन वर्ष संभाळली. नुकतेच वाघोलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे सुट्टीवर असताना त्यांच्याकडे २५ ते २७ जानेवारी या तीन दिवसात वाघोली व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्याची जबाबदारी होती. त्यांच्याकडे वाघोलीचा तात्पुरता चार्ज असताना नेमके याच तीन दिवसांत वाघोलीत दोन खुनाच्या घटना घडल्या. त्यातील आरोपींना त्यांनी तत्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्था राखत आपली कामगिरी दाखवून दिली. 

त्यांना २०२५ मध्ये सुरक्षित पुणे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते अत्यंत शांत व संयमी स्वभावाचे अधिकारी होते. अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर कायम हसतमुख असायचे. त्यांच्या या अचानक जाण्याने पोलिस दलात व वाघोली- लोणीकंद परिसरात खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई, एक मोठा भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश व मुलगी सिद्धी दोघेही शिक्षण घेत आहेत. मुलगी सिद्धी ही बीएएमएसचे शिक्षण घेत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.