Breaking! शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरी किल्ल्यावर काहीकाळ गोंधळ; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यासाठी कालपासूनच
शिवप्रेमींनी शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. यादरम्यान
काल संध्याकाळी शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन त्यात काही जण जखमी
झाल्याचा दावा केला जात होता. यानंतर येथे नेमकी काय घटना घडली? याबद्दल
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी माहिती दिली आहे.
शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी
झाल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता गिल यांनी अशी कोणतीही घटना घडली
नसल्याचे म्हटले आहे. "काल संपूर्ण दिवसभर जुन्नर येथील शिव जन्मस्थान
असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सकाळपासून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येत
होते. लोकांची रात्रभर दर्शनासाठी ये-जा सुरू होती. येथे दर्शन केल्यानंतर
खाली जाताना पहिल्यांदा मिना दरवाजा येतो. येथे ज्योत घेऊन आलेला एक गट
खाली उतरत होता. त्यामध्ये १५-२० लोक होते. तेथे आमचे एक पीएसआय आणि ५-६
लोक उपस्थित होते. हे लोक थोडे घाई गडबडीत खाली उतरत होते. तेव्हा त्यांना
रोखण्यातदेखील आले. मात्र त्यापैकी एका तरुणाचा पाय घसरला आणि त्यामुळे ७-८
लोक खाली पायऱ्यांवर पडले. त्यापैकी तिघांच्या पायाला जखम झाली आहे.
सर्वजण सुखरूप आहेत. चेंगराचेंगरीसारखा काहीही विषय नाही," असे गिल यांनी
स्पष्ट केले.
या घटनेनंतर सातत्याने पूर्णपणे नियंत्रित पद्धतीने लोक किल्ल्यावर येत आहेत आणि तशाच पद्धतीने खाली उतरत आहेत, असेही गिल यावेळी म्हणाले. राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच शिवनेरी येथे होणाऱ्या खास सोहळ्यासाठीदेखील मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी या दिवशी राज्यभरातून शिव ज्योत घेऊन असंख्य तरूण आणि विविध संघटनाचे कार्यकर्ते गडावर येतात. यावर्षीदेखील तोच उत्साह पाहायला मिळाला.शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज, (१९ फेब्रुवारी) विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पारंपरिक शिवजन्म सोहळा पार पडला. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देखील देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.