मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे सोन्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दराने लाखोचा टप्पा ओलांडल्या मुळे, सोन्याच्या अधिकृत आयातीपेक्षा तस्करीकडे गुन्हेगारांचा कल वाढला आहे. दुबई, मस्कत आणि बँकॉक सारख्या शहरांमधून छुप्या मार्गाने सोनं भारतात आणण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे.
सोनं तस्करी करण्यासाठी आता जुन्या पद्धती मागे पडल्या आहेत. तस्करी करणाऱ्या टोळ्या (सिंडिकेट्स) आता अत्यंत भयानक आणि कल्पक मार्गांचा अवलंब करत आहेत. सोन्याची धूळ आणि मेणाचे मिश्रण ही सध्याची सर्वात प्रचलित पद्धत आहे. सोन्याची धूळ मेणामध्ये मिसळून त्याचे लहान कॅप्सूल तयार केले जातात. हे कॅप्सूल प्रवासी आपल्या शरीरात (गुदद्वार किंवा पोटात) लपवून आणतात. विमानतळावर मेटल डिटेक्टरमधून वाचण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो. त्याचबरोबर सोन्याला केमिकल प्रक्रियेद्वारे पेस्टच्या स्वरूपात बदलले जाते. ही पेस्ट कपड्यांच्या आतल्या बाजूला, बॅगेच्या अस्तरात किंवा अगदी सॅनिटरी पॅड्समध्ये लपवून आणली जाते. लॅपटॉप, मोबाईल चार्जर, हेअर ड्रायर आणि मायक्रोव्हेव ओव्हनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सोन्याच्या तारा किंवा प्लेट्स बसवून तस्करी केली जाते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रकरणांमध्ये विमान कंपनीचे कर्मचारी, ग्राउंड स्टाफ आणि अगदी कंत्राटी कामगारही या टोळ्यांना मदत करतात. विमानातील वॉशरूममध्ये किंवा सीटच्या खाली सोनं लपवून ठेवलं जातं, जे नंतर हे कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर काढतात.मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तस्करांच्या निशाण्यावर असते. 'डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' (DRI) आणि कस्टम्स विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात कारवाईत मोठी वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)ने २०२५ या वर्षात सातत्याने कारवाया करत मोठ्या तस्करी साखळ्यांवर प्रहार केला आहे. २०२५ या वर्षभराच्या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या कारवायांत डीआरआयने तब्बल ५६.६५ किलो सोनं जप्त केले आहे, या कारवायांमध्ये एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने देखील वर्षभरात जवळपास १०० किलोपेक्षा अधिक अवैध सोनं जप्त करून या मोठ्या प्रमाणात तस्करांना अटक करण्यात आलेली आहे.तस्करांकडून सोनं हे चप्पल, बूट, कमरपट्टे, शरीरावर लपवून, तसेच विशेष तयार केलेल्या वस्तूंमध्ये लपवून भारतात आणण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. काही प्रकरणांत परदेशी (पान ६ वर) (पान ३ वरून) नागरिकांचाही सहभाग समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या वाढत्या किंमती, आयात शुल्कातील फरक आणि जलद नफ्याच्या मोहामुळे आंतरराष्ट्रीय तस्करी साखळ्या अधिक सक्रिय झाल्या आहेत. मात्र डीआरआयने विमानतळ, बंदरे आणि इतर मार्गांवर देखरेख वाढवल्याने अशा कारवायांना मोठा फटका बसत आहे. एका अहवालानुसार, मुंबई विमानतळावर दररोज सरासरी मोठ्या प्रमाणात अवैध सोनं पकडलं जातं. मात्र, तज्ज्ञांच्या मते पकडलं जाणारं सोनं हे एकूण तस्करीच्या केवळ १० ते १५ टक्केच असतं; उर्वरित सोनं विविध मार्गांनी बाजारात पोहोचतं. तस्करी वाढण्यामागची प्रमुख कारणे भारतात सोन्यावर आयात शुल्क जास्त असल्याने, अधिकृत मार्गाने सोनं आणणं महाग पडतं. तस्करी करून आणलेल्या सोन्यावर हे शुल्क वाचवून तस्कर १० ते १५ टक्के थेट नफा मिळवतात.
आंतरराष्ट्रीय किमतींमधील तफावत
दुबई
आणि भारतातील सोन्याच्या दरात असलेली मोठी तफावत हे मुख्य आकर्षण आहे,
अनेकदा गरीब किंवा मध्यमवर्गीय प्रवाशांना 'कॅरिअर' म्हणून वापरले जाते.
एका खेपेसाठी त्यांना २०,००० ते ५०,००० रुपये आणि परदेश प्रवासाचे तिकीट
दिले जाते.
महसूल गुप्तचर संचालनालय आणि कस्टमची भूमिका
तस्करांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अधिकारी आता तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. संशयास्पद प्रवाशांचे 'प्रोफायलिंग' केले जाते. ज्या प्रवाशांच्या प्रवासाच्या फेऱ्या संशयास्पद आहेत, त्यांच्यावर कडक नजर ठेवली जाते. क्ष-किरण मशीन आणि प्रगत स्कॅनर्समुळे आता शरीरात लपवलेले सोनेही पकडणे सोपे झाले आहे. मात्र, तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे, कारण तस्कर दरवेळी नवनवीन मार्ग शोधून काढतात. अलीकडेच विमानातील अन्नाच्या ट्रेमध्ये आणि चप्पलच्या सोलमध्येही सोने सापडल्याने अधिकारी अवाक झाले होते. सोन्याची तस्करी ही केवळ आर्थिक गुन्हा नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. जोपर्यंत सोन्याच्या दरातील अस्थिरता आणि आयात शुल्काचे गणित सुटत नाही, तोपर्यंत हे आव्हान कायम राहणार आहे. केवळ कठोर कायदे आणि विमानतळावरील कडक सुरक्षाच या काळ्या बाजाराला चाप लावू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.