सांगली : सांगली पोलीस दलातील ५९ जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून मुलींच्या १८ जागांसाठी ५४२ मुलींनी मैदानी परीक्षा दिली आहे. तर मुलांच्या ४१ जागांसाठी २३२४ मुलांना बोलावण्यात आले असून त्यांची मैदानी खेळाची चाचणी आज व उद्या अशा दोन टप्प्यात घेण्यात येत आहे. ५९ जागांसाठी २ हजार ८६६ उमेदवारांची
मैदानी व लेखी परीक्षा होत आहे. सांगली पोलीस दलातील भरती प्रक्रिया
बुधवारपासून सुरू झाली आहे. तीन दिवस मैदानी खेळाची म्हणजे, गोळा फेक,
धावणे याबाबत उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. मुलींच्या १८ जागा असून
यासाठी ७४७ मुलींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ६४२ जणांना मैदानी
क्षमतेसाठी बोलावण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक क्षमता याची
तपासणी केल्यानंतर यापैकी ५४२ मुलींची धावणे, गोळा फेक यासाठी निवड करण्यात
येऊन त्यांची चाचणी घेण्यात आली.
५९ जागांसाठी २८६६ उमेदवारांचे भवितव्य पणाला
गुरूवारी कागदपत्रासह १११४ तरूणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडूनही मैदानी क्षमतेची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी उर्वरित १२१० तरूणांना कागदपत्रांची पडताळणी, शारिरीक तपासणी व मैदानी क्षमतेसाठी पाचारण करण्यात आले आहे. यानंतर या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. यातून अंतिम निवड केली जाणार आहे. पोलीस भरती पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक चाचणी, पडताळणीचे छायाचित्रण करण्यात येत असून यासाठी पाच पोलीस अधीक्षकासह १४ पोलीस निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, २२० अंमलदार नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.