मनोज नरवणेंच्या पुस्तकाच्या वादावर राहुल गांधींचं पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले, "पुस्तकाचे प्रकाशक खोटं."
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. मनोज नरवणे यांचं 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही. मात्र, याच पुस्तकातील काही उल्लेखांवरून राहुल गांधी लोकसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता.
दरम्यान या पुस्तकाच्या प्रकाशनावरून वाद सुरू असतानाच पुस्तकाची प्रकाशन कंपनी पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदन सादर करत स्पष्टीकरण दिलं. 'मनोज नरवणे यांच्या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापल्या नाहीत', असं पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने म्हटलं. पेंग्विन पब्लिकेशन्सच्या या स्पष्टीकरणानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा या प्रकरणावर मोठं भाष्य केलं. 'एक तर मनोज नरवणे खोटं बोलत असतील किंवा पुस्तकाची प्रकाशन कंपनी खोटं बोलत असेल', असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, "माजी लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की, "माझ्या पुस्तकासाठी या लिंकला फक्त फॉलो करा", असं सांगत राहुल गांधी यांनी त्या ट्विटचा फोटो दाखवला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, "एक तर एम.एम.नरवणे खोटं बोलत आहेत किंवा पेंग्विन पब्लिकेशन्स खोटं बोलत आहे. मात्र, मला वाटत नाही की नरवणे खोटं बोलतील. पण तरी पेंग्विन पब्लिकेशन्सने म्हटलंय की हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. मग तरीही हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यामुळे मला पेंग्विन पब्लिकेशन्सपेक्षा एम.एम.नरवणे यांच्यावर जास्त विश्वास आहे. मला वाटतं की एम.एम.नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या भारत सरकार आणि पंतप्रधानांसाठी अडचणीच्या आहेत", असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पुस्तकाच्या वादावर पेंग्विन पब्लिकेशन्सने काय खुलासा केला?
मनोज
नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकाच्या वादाच्या
पार्श्वभूमीवर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदन सादर करत म्हटलं की, "हे
पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही, पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क
आमच्याकडे असून आतापर्यंत या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती, छापील किंवा
डिजिटल स्वरूपात प्रकाशित, वितरित, विकल्या किंवा इतर कोणत्याही प्रकारे
जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. या बरोबरच पुस्तकाचा कोणताही भाग
आमच्याकडून कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुस्तकाचं
कोणत्याही प्रतीचे प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात प्रसारण करणं हे
कॉपीराइटचं उल्लंघन आहे."
तसेच
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदनात असा इशारा देखील दिला की, सध्या
प्रसारित होत असलेल्या पुस्तकाच्या कोणत्याही आवृत्तीत कॉपीराइट उल्लंघन
आहेत आणि त्या त्वरित बंद केल्या पाहिजेत. तसेच पुस्तकाच्या बेकायदेशीर आणि
अनधिकृत प्रसाराविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पुस्तक
प्रकाशन हाऊसने दिला.
अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप, गुन्हा दाखल
समोर आलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या ऑनलाइन प्रसारित झाल्याच्या आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नक्की काय?
जनरल
नरवणे यांनी आत्मचरित्रात त्यांच्या ४० वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव
मांडला आहे. 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' असे या पुस्तकाचे नाव आहे. जानेवारी
२०२४ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मात्र, त्यातील दोन प्रमुख
विषयांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. डिसेंबर २०२३ मध्ये पीटीआय
वृत्तसंस्थेने त्यातील काही उतारे प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय लष्कराने या
पुस्तकाची तपासणी (रिव्ह्यू) सुरू केली. या उताऱ्यांमध्ये २०२० साली भारत व
चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख होता.
त्यावेळी
पूर्व लडाखमधील भागात चिनी रणगाडे भारतीय चौक्यांच्या अगदी जवळ आले होते.
अत्यंत तणावाच्या क्षणी भारतीय राजकीय नेतृत्वाकडून (पंतप्रधान आणि संरक्षण
मंत्री) स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला आणि शेवटी निर्णय घेण्याचा
अधिकार लष्करावरच सोपवण्यात आल्याचे पुस्तकात नमूद आहे. त्याशिवाय २०२३
मध्ये लागू करण्यात आलेल्या 'अग्निपथ' भरती योजनेबाबत सशस्त्र दलांमध्ये
झालेल्या चर्चांचा तपशीलही या पुस्तकात असल्याचे सांगितले जात आहे.
पुस्तकाचे प्रकाशन कशामुळे रखडले?
जनरल नरवणे यांचे चरित्र २०२४ मध्ये प्रकाशित होणार होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याचे प्रकाशन रडखडले आहे. त्यामागचे कारण म्हणजे- लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून त्याची छाननी केली जात आहे. भारतीय संरक्षण दलाच्या नियमांनुसार, लष्करी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरुपात सेवेशी संबंधित बाबी प्रसारमाध्यमांना देण्यास मनाई आहे. तसेच, केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता अशा स्वरूपाचे पुस्तक किंवा कोणताही दस्तऐवज प्रकाशित करण्यासही बंदी आहे.त्याशिवाय सेवेत असलेले अधिकारी केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय राजकीय प्रश्नांशी संबंधित, सेवाविषयक बाबींवर किंवा लष्करी विषयांवर आपले मत मांडणारे व्याख्यान देऊ शकत नाहीत. नियमांनुसार, 'सेवा माहिती' आणि 'सेवाविषयक बाबी' या संज्ञांमध्ये सशस्त्र दल, संरक्षण व्यवस्था तसेच केंद्र सरकारचे परराष्ट्र संबंध यासंबंधीची माहिती व विषयांचा समावेश होतो. अधिकाऱ्यांच्या मते, सशस्त्र दलातील एखाद्या व्यक्तीने आपल्या सेवेशी संबंधित नसलेले साहित्यिक अथवा कलात्मक स्वरूपाचे पुस्तक लिहिलेले असल्यास त्यावर हे नियम लागू होत नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.