Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा; सर्व चर्चा संपवल्या, सुनेत्रा पवारांवरही स्पष्टच बोलले!

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा; सर्व चर्चा संपवल्या, सुनेत्रा पवारांवरही स्पष्टच बोलले!
 

नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून मागील काही दिवसांपासून राजकीय रणकंदन सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू झाल्यानंतर तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र आता पटेल यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय योग्य रीतनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवाय होईल," असं म्हणत आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं आहे.

"जे लोक कधीही लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढले नाहीत, अशा लोकांनी माझ्याबद्दल चर्चा करणं योग्य आहे का? 1952 पासून माझ्या वडिलांना जनतेनं निवडून दिलं आणि मलाही अनेक वर्षे लोकांनी निवडून दिलं आहे. आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी अशी चर्चा करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे," असा हल्लाबोल प्रफुल्ल पटेल यांनी टीकाकारांवर केला आहे. तसंच "आमच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल कोणतंही वक्तव्य केलं गेलेलं नसताना उगाच हे वादळ निर्माण करणं आणि आमच्या पक्षात संशय निर्माण करणं, ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. आमच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा आम्ही योग्य निर्णय घेणार आहोत. मी सोडून इतर कोणाकडे तरी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल. योग्य व्यक्तीची या पदावर निवड केली जाईल. मी राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष म्हणून अजितदादांच्या निधनानंतर पुढे काय, नेतृत्व कोणाकडे, या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी ती योग्य रीतीने पार पाडत आहे," असा दावा पटेल यांनी केला आहे.
 
राज ठाकरेंवर पलटवार
राष्ट्रवादीसारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष कोणीतरी मराठी झाला पाहिजे, कोणी पाटील चालेल, पण पटेल नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देताना पटेल म्हणाले की, " राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा विधीमंडळ नेता किंवा अध्यक्ष कोण होणार, हे ठरवणार का? ते आमच्या पक्षाचे नेते आहेत का? राज ठाकरे असतील किंवा सकाळचे जे ९ वाजताचे बुलेटिन आहे , ते आम्हाला आम्ही काय करायचं सांगत आहेत. पण आम्ही उपमुख्यमंत्रिपदाबाबत जसा योग्य निर्णय घेतलाय, तसाच योग्य निर्णय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल घेऊ आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे," असं ते म्हणाले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचं जाहीर केल्याने सुनेत्रा पवार यांची निवड या पदावर निश्चित मानली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.