बदलापूर: गरजू महिलांना हेरून त्यांना पैशांचे आमिष दाखवत, त्यांच्या गर्भाशयात स्त्रीबीज वाढवण्याचे आणि त्यांची बेकायदा विक्री करण्याचे रॅकेट बदलापूरच्या जोवेली भागात उघडकीस आले आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या तीन महिलांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जोवेली भागात नॅनो सीटी येथील एका इमारतीत सुलक्षणा गाडेकर या महिलेच्या घरात हे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बदलापूर पूर्व पोलिसांच्या पथकाने बुधवारी बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकासह छापा मारला. या घरात गर्भाशयात स्त्रीबीजांची वाढ करण्यासाठी लागणारी इंजेक्शन आढळून आली. गाडेकर ही गरजू महिलांना हेरून पैशांचे आमिष दाखवत असे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना इंजेक्शन देत त्यांच्या गर्भाशयात स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवत असे. तेथील डॉक्टरांकडून गर्भाशयातील बीजांडे काढून त्यांची विक्री केली जात असे, असे पोलिसांनी सांगितले.आरोपी महिलेच्या मोबाइलमध्ये गर्भधारणेसाठी लागणारी इंजेक्शन, सोनोग्राफी, काही महिलांच्या खोट्या नावांची प्रतिज्ञापत्रे, इतर बनावट कागदपत्रे, तसेच काही महिलांची आणि आर्थिक व्यवहारासंबंधीची छायाचित्रे पोलिसांना आढळून आली आहेत. त्यामुळे गरजू महिलांकडून वारंवार 'डोनर'चे काम करून घेत, शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपींविरोधात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४६) या तीन महिलांना अटक केली. 'या प्रकरणात २० हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज असून त्यांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. आणखी काही आरोपींचा हात असल्याबाबत तपास सुरू आहे,' असे परिमंडळ चार, उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.