गोगावलेंच्या मुलाला मदत कर, माझ्यावर दबाव, जातीवरूनही हिणवतात, मी जीव देतो... डॅशिंग PI चं थेट DGP ना पत्र
रायगड: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. आपला वरिष्ठांकडून जाणूनबुजून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी
केला आहे. तसेच जातीवाचक शब्द वापरून हिणवलं जात असल्याचा आरोपही संबंधित
पोलीस निरीक्षकांनी केला आहे. रमेश तडवी असं पोलीस निरीक्षकाचं
नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित
आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली आहे. मागील दोन वर्षात आपली दोन वेळा
मुद्दाम बदली करण्यात आली, असा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे. शिवसेना
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पूत्र विकास गोगावले यांना सहकार्य न
केल्याच्या कारणातून आपला मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलीस निरीक्षक रमेश तडवींनी पत्रात काय म्हटलं?
रमेश तडवी यांनी पत्रात म्हटलं की, महाड शहर पोलीस ठाणे येथे नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद झाला होता. या वादातून महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा रजि नंबर १७८/२०२५ मध्ये भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी होता. त्याला सहकार्य करण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक श्री. अभिजीत शिवधरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड श्री. शंकर काळे, पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, यांनी बनाव करून बेकायदेशीर तीन इसमांना मला अटक करण्यासाठी सांगत होते. परंतु मी त्यांना अटक केली नाही.यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी माझी विनाकारण बदनामी करण्यास सुरवात केली. मी सदर प्रकाराबाबत पोलीस अधिक्षक श्रीम. ऑचल दलाल यांना माहिती दिली होती. परंतु त्यादेखील या कटामध्ये सहभागी असल्याने त्यांनी वरील लोकांचे ऐकून माझी काहीएक चूक नसताना फक्त मी खालच्या जातीचा आहे. या कारणास्तव माझी २०/०२/२०२६, रोजी महाड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते नियंत्रणकक्ष अलिबाग अशी बदली केलेली आहे. सदर बदली आदेशामुळे मी तसेच माझे कुंटूब प्रचंड ताण तणावाखाली गेलेले आहे. माझ्यावर वांरवार होणारा अन्याय आता मला तसेच माझे कुंटूबाला सहन होत नसल्याने मी स्वताः तसेच माझ्यासोबत माझं कुंटूब असं आम्ही आत्महत्या करत आहोत, असं पत्रात लिहिलं आहे. तसेच त्यांनी आपल्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे, यांची नावं देखील त्यांनी पत्रात नमूद केली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.