पुणे :-"मांजरीच्या दूध-बिस्किटासाठी 200 रुपये दे, नाहीतर तुझ्यावर" लोणी काळभोर महिला वाहतुक पोलिसाची वाहनचालकाकडे अजब मागणी..
लोणी काळभोर, ता. 17 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.16) नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. सूर्य डोक्यावर आला होता… आणि कवडीपाट टोलनाक्याजवळ एक तरुण त्याची जुनी दुचाकी घेऊन कामासाठी निघाला होता. त्याला काय माहिती… पुढे त्याच्यासोबत काय घडणार आहे! रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसांच्या नजरेत त्याची गाडी पडली. हात वर करून त्याला थांबवण्यात आलं.
"गाडी बाजूला लाव…" आदेश आला. तरुण थोडा घाबरला. गाडीची नंबर प्लेट तुटलेली होती, हे त्याला माहित होतं. तो नम्रपणे म्हणाला, "मॅडम, चूक झाली… माफ करा." क्षणभर शांतता पसरली… पण पुढचं वाक्य ऐकून तो थक्क झाला! "दंड वगैरे काही घेत नाही… आमच्या मांजरीसाठी दूध घेऊन ये… आणि बिस्किटसाठी 200 रुपये दे… मग जा!" तरुणाला वाटलं, कदाचित तो चुकीचं ऐकत असेल… पण नाही… आवाज पुन्हा आला. यावेळी अधिक कठोर. "पैसे दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही!"
त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नाहीसा झाला. खिशात हात घातला… पण फक्त काही सुट्टे पैसे. तो हळू आवाजात म्हणाला, "मॅडम, माझ्याकडे पैसे नाहीत… मी गरीब आहे…" पण कायद्याचा आधार देणाऱ्यांनीच त्याची विनंती फेटाळली. घाम फुटला… डोळ्यांसमोर काम, घर, जबाबदाऱ्या सगळं तरळू लागलं.शेवटी त्याने मित्राला फोन केला. मित्राने त्याला पैसे घेण्यासाठी बोलावले. काही वेळात 250 रुपये मिळाले… आणि त्याने ती 'फर्माईश' पूर्ण केली. तो निघून गेला… पण मनात एकच प्रश्न घेऊन, हा दंड होता का? की कायद्याच्या नावाखाली झालेला सौदा? त्या दिवशी फक्त एक तरुण नाही… तर कायद्यावरील विश्वासही थोडा हादरला.रस्त्यावर उभा असलेला पोलिस गणवेश… जो सुरक्षिततेचं प्रतीक असतो… तोच काही क्षणांसाठी भीतीचं कारण बनला.आणि आता हा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात घुमतोय."जर रक्षण करणारेच सौदा करू लागले… तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?" अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.लोणी काळभोर परिसरात वाहतूक पोलिसांच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, "नियम फक्त सामान्यांसाठीच का?" असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. महिला, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या गाड्या अडवून किरकोळ कारणांवरून दंडात्मक कारवाई केली जाते, तर दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मात्र बिनधास्तपणे रस्त्यावर धावताना दिसत आहेत. या दुहेरी धोरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "ज्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्याकडे दुर्लक्ष… आणि जे नियम पाळतात, त्यांनाच त्रास" अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांचा असा अनागोंदी आणि मनमानी कारभार वारंवार सुरू असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
