रात्री तिघे कॉलेज कॅम्पसमध्ये घुसले, तरुणीला उचलून नेत सामूहिक अत्याचार, देशाला हादरवणारी घटना!
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर कॉलेज कॅम्पसमध्ये तीन जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित तरुणीचं रिक्षातून अपहरण केलं होतं.
अपहरणानंतर तिला कॉलेज कॅम्पसमधील निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र एका महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात घडली आहे. ग्वाल्हेरमधील डबरा परिसरात २० वर्षीय पीडित तरुणीचं अपहरण करून तिच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शुक्रवारी उशिरा रात्री तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणी एका स्थानिक स्टॉलवर स्नॅक्स खाण्यासाठी गेली होती. त्याचवेळी ई-रिक्षातून आलेल्या दोन नराधमांनी तिला वाटेतच अडवलं. तिच्यासोबत काय घडतंय, हे कळण्याआधीच आरोपींनी तिचं तोंड दाबलं आणि तिला बळजबरीनं रिक्षात खेचलं.
कॉलेज कॅम्पसमध्ये सामूहिक अत्याचार
पीडितेचं अपहरण करून निर्जन स्थळाकडे नेत असताना आरोपींनी वाटेत त्यांच्या अन्य एका तिसऱ्या साथीदारालाही सोबत घेतले. त्यानंतर हे तिन्ही आरोपी पीडितेली कॉलेज कॅम्पसमध्ये निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या पाशवी अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला धमकावून तिथून पळ काढला.
तब्येत खालावल्यानंतर प्रकार उघड
ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणी प्रचंड धक्क्याखाली होती. भीतीपोटी तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितलं नाही. मात्र, काही दिवसांनंतर तिची प्रकृती खालावली आणि त्रास वाढू लागला, तेव्हा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आणि संशयितांचा शोध सुरू केला. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये घडली, तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
