पुणे :- गुंगी येणारे पेय देऊन विवाहित महिलेवर अत्याचार; पुण्यातील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यचा कारनामा उघड
हडपसर(पुणे) : नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच मांजरी येथे एका भोंदू बाबाचा कारनामा उघड झाला आहे. फेसबुकवरील ओळखीतून नाते निर्माण करीत एका विवाहितेवर अत्याचार केला आहे. या भोंदूवर मांजरी बुद्रुक येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एका विवाहित महिलेची भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याच्याशी दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित ऋषिकेश वैद्य याने मी महादेवाचा भक्त असून महादेवाची उपासना कशी करायची हे शिकवतो, "मी महादेव आणि तू पार्वती" असे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.संबंधित महिलेला या गोंधणी मांजरी परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगी येणारे पेय देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा वसईच्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणानंतर हिम्मत आलेल्या या महिलेने ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलिस स्टेशन, वसई येथे झिरो नंबरने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करून येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.