Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महसूल विभागाचा महाघोटाळा, दीड लाख शेतकऱ्यांचे थेट ७/१२ उतारे बदलले, अधिकाऱ्यांकडून फसवणूक! मंत्री बावनकुळेंची कबुली

महसूल विभागाचा महाघोटाळा, दीड लाख शेतकऱ्यांचे थेट ७/१२ उतारे बदलले, अधिकाऱ्यांकडून फसवणूक! मंत्री बावनकुळेंची कबुली


मुंबई: महसूल विभागात खळबळ उडवून देणारा एक मोठा गैरप्रकार अधिवेशन काळात समोर आला आहे. जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ (सातबारा) उताऱ्यात फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ चा चुकीचा अर्थ लावून महसूल अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर आदेश पारित केल्याचे सांगत अधिवेशन काळातच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी सभागृहाला दिली.
पुणे जिल्ह्यात काही महसूल अधिकाऱ्यांनी ​जमीन महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कांतच परस्पर बदल केले. आमदार अनिल परब यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल जानेवारी महिन्यात आला.



मूळ मालकाची संमती नसतानाही ७/१२ मध्ये बदल
अहवालात महसूल प्रशासनातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ​अनेक प्रकरणांमध्ये मूळ मालकाची संमती नसतानाही ७/१२ मध्ये बदल करण्यात आले. ​नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून हितसंबंध जपल्याचे समोर आले आहे. ​जमिनी बिगरशेती (NA) करताना आणि मालकी हस्तांतरित करताना अनेक प्रकरणांत अनियमितता आढळल्याचे अहवालातून समोर आले आहे.
होय घोटाळा झालाय, ​मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात उघड कबुली

शुद्धलेखनात बदल करण्याच्या नावाखाली सातबारा बदलले गेले, ही बाब गंभीर आहे. महसूल खात्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, अशी जाहीर कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या घोटाळ्यात जवळपास दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता महसूलमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ते अधिकारी निलंबित करा- अनिल परब आक्रमक
महसूल खात्यातील अनियमिततेची कबुली खुद्द महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर लगोलग फौजदारी कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.