नाशिक : सिमेंट बंधारा दुरुस्ती कामांचे देयक मंजूर करण्यासाठी ७२ हजार रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषदेतील लघू पाटबंधारे विभागाच्या महिला कार्यकारी अभियंत्यासह वरिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
संशयितांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक जिल्हा परिषद, लघू पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता (वर्ग एक) वैशाली तुळशीराम ठाकरे (४२) आणि याच कार्यालयातील वरिष्ठ सहायक लेखाधिकारी (वर्ग तीन) अरूण रमेश धारणकर (५१) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सहकारी सोसायटीने गडदवणे व तुंगारपाडा (ओझरखेड) येथील लघू पाटबंधारे योजना (शून्य ते १०० हेक्टर सिंचन) बिगर आदिवासी क्षेत्र स्थानिक संस्थांना सहायक जिल्हा योजना, सर्वसाधारण योजना, सहायक अनुदाने अंतर्गत सिमेंट कॉक्रिट बंधारा दुरुस्तीची कामे निविदेनुसार पूर्ण केली होती. या कामांचे १६ लाख १९ हजार २९० रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेतील लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहायक लेखाधिकारी अरूण धारणकर यांनी सुरुवातीला ७२ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच मागितली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रतिभा आबुज व सहायक अधिकारी म्हणून स्वप्नील राजपूत यांनी काम केले. कारवाई पथकात हवालदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे आदींचा समावेश होता. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर या विभागाच्या पथकाने पडताळणी केली. तेव्हा संशयित कार्यकारी अभियंता ठाकरे व लेखाधिकारी धारणकर यांनी देयक मंजुरीसाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ही रक्कम स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.
जिल्हा परिषदेतील लघूपाटबंधारे विभाग कार्यालयात तक्रारदाराकडून ही रक्कम कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे या स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी कार्यकारी अभियंता ठाकरे व लेखाधिकारी धारणकर यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित ठाकरे व धारणकर यांना गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घर झडती प्रगतीपथावर
कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि सहायक लेखाधिकारी धारणकर यांच्या घरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. गृहोपयोगी वस्तू वगळता अजून काही आढळले नसून झडतीचे काम अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
