सिगारेटच नव्हे 'ओरल सेक्स'ही ठरतोय घशाच्या कर्करोगाला कारणीभूत; अमेरिका-ब्रिटननंतर भारताची चिंता वाढली!
कर्करोग हा जीवघेणा आजार समजला जातो. अलिकडे बदलत्या जीवनशैलीचा मोठा प्रभाव नागरिकांच्या आरोग्यावर पडल्याचे दिसून येते. भारतात घशाच्या कर्करोगाचा जवळचा संबंध धूम्रपान आणि तंबाखू खाण्याशी जोडला जातो. पण, घशाच्या कर्करोगासाठी आता मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) देखील कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ओरल सेक्स (मुख मैथुन) मुळे हा विषाणू पसरु शकतो, असे डॉक्टरांनी म्हटलंय.
अमेरिका आणि युनाडेट किंगडममध्ये रुग्ण
लैंगिक आरोग्याबाबत यामुळे नव्याने चर्चा होऊ लागली आहे. याशिवाय मानवी पॅपिलोमा विषाणू लसीकरण आणि जनजागृती याची गरज व्यक्त केली जात आहे. भारतात धूम्रपान घशाच्या कर्करोगासाठी आजही मुख्य कारण समजले आहे. पण, अमेरिका आणि युनाडेट किंगडममध्ये तंबाखूच्या जागी आता ओरल सेक्समुळे घशाचा कर्करोग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जगात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओरल सेक्समुळे संक्रमणाचा धोका
हा विषाणू नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडतो पण, अतिधोकादायक असणारे एचपीव्ही -१६ आणि एचपीव्ही -१८ शरीरातच राहतात यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. पॅपिलोमा विषाणू गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. ऑरोफॅरिंजियल कर्करोगाशी देखील याचा संबंध जोडला जातो. हे विषाणू टॉन्सिल आणि जीभेवर परिणाम करतात. ओरल सेक्समुळे हा विषाणू पसरतो आणि घशातील पेशींना संक्रमित करतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
एचपीव्ही विषाणूबाबत चिंता
भारतात डोक्याचा आणि गळ्याचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशातील सर्व कर्करोगांपैकी या कर्करोगाचे प्रमाण एक तृतीयांश असून, जगभरात सर्वाधिक प्रमाणांपैकी एक आहे. तरी देखील देशात आजही धूम्रपान आणि तंबाखूमुळे घशांचा कर्करोग होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. एचपीव्ही विषाणूला बळी पडलेल्या रुग्णांची संख्या देखील आहे पण, तंबाखूच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती आहे. धूम्रपान किंवा तंबाखूचे व्यसन नसणाऱ्या नागरिकांमध्ये घशाचा कर्करोग झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने एचपीव्ही विषाणूबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
लक्षणे काय आहेत?
प्रमुख लक्षणांमध्ये घसा कोरडा पडणे अशा लक्षणांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिककाळ घसा कोरडा राहणे, गिळण्यासाठी त्रास होणे, कान दुखणे, गळा किंवा घशात गाठ आणि अचानक वजन कमी होणे अशी काही लक्षणे सुरुवातीला या रुग्णांमध्ये दिसतात. लवकर निदान झाल्यास रुग्णांमध्ये चांगला सुधार होतो, असे डॉक्टर सांगतात.
एचपीव्ही लसीकरण
सरकारकडून वाढणाऱ्या घटनांची दखल घेतली जात असून, १४ वर्षांच्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने २८ फेब्रुवारीला या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. लसीकरणामुळे एचपीव्ही विषाणूमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मुलांना देखील आताही लस देण्यात यावी, असे काही वैद्यकीय तज्ज्ञ मत मांडत आहेत. एचपीव्ही लैंगिक संपर्कातून होतो आणि दोघांवर परिणाम करु शकते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.