इस्त्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा
इस्राईल-इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे भारतात इंधन पुरवठ्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या चर्चा रंगल्या असतानाच, छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काल रात्री वाहनधारकांची मोठी गर्दी पेट्रोल पंपांवर दिसून आली. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात थांबेल आणि पंप बंद पडतील, अशा अफवांमुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लोकांनी इंधन साठवण्यासाठी रांगा लावल्या.
बिडकीन गावात गर्दी
पैठण तालुक्यातील बिडकीन गावात विशेषतः ही गर्दी अधिक दिसली. निलजगाव रोडवरील पंपांसह शहरातील इतर ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक जण दुचाकी, चारचाकी वाहनांसोबत प्लास्टिकच्या डब्यांमध्येही पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी थांबले होते. काही पंपांवर साठा संपल्याने ते तात्पुरते रिकामे झाल्याचे चित्र समोर आले. वाहनधारकांशी बोलताना एका नागरिकाने सांगितले, "सोशल मीडियावरून पेट्रोल पंप बंद होणार असल्याची बातमी वाचली. पुढच्या काही दिवसांत इंधन मिळणार नाही असे वाटल्याने मी इथे आलो." अशा अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते.दरम्यान, पेट्रोल पंप मालकांच्या संघटनेने आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या इंधनटंचाईची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. नियमित पुरवठा सुरळीत चालू असून, कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. तरीही अफवांमुळे वाढलेली गर्दी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत तेल वाहतुकीला मोठा धक्का
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तेल वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या रक्षक दलाने या महत्त्वाच्या जलमार्गाला पूर्णपणे बंद करण्याची घोषणा करत जहाजांना आग लावण्याची धमकी दिली आहे. यामुळे मार्च महिन्यात या मार्गावरील तेल वाहतूक ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटली आहे. विंडवर्ड आणि केप्लर या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आकडेवारीनुसार, १ मार्च रोजी केवळ तीन टँकर या सामुद्रधुनीतून गेले, ज्यात सुमारे २.८ दशलक्ष बॅरल तेल होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे २ मार्चला फक्त एक छोटा टँकर आणि एक मालवाहू जहाजच पार झाले. सध्या दोन्ही बाजूंकडे अंदाजे ७०६ गैर-इराणी टँकर अडकले आहेत. यातील ३३४ टँकर कच्च्या तेलाने भरलेले आहेत, तर १०९ डर्टी आणि क्लीन प्रॉडक्ट वाहून नेणारी जहाजे आहेत.
परिस्थितीवर सतत लक्ष
भारत या संकटाकडे विशेष चिंतेने पाहत आहे, कारण देश मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. पेट्रोलियम मंत्रालयाने या विकसित होत असलेल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवली आहे. कच्च्या तेलाच्या उपलब्धता, एलपीजी आणि इतर उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुरवठ्याचा आढावा घेतला.फेब्रुवारी महिन्यात संसदेत उत्तर देताना मंत्री पुरी यांनी सांगितले होते की, जागतिक स्तरावरील अस्थिरतेतही भारताचे धोरणात्मक तेल साठे ७४ दिवस पुरेसे आहेत. "वेगाने विकसित होत असलेल्या देशासाठी सुरक्षित आणि व्यवहार्य इंधन साठे आवश्यक आहेत, जेणेकरून अशा संकटकाळातही देश सुरक्षित राहील," असे त्यांनी नमूद केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
