Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरगुती गॅस सिलिंडर चार दिवसांत घरपोच बंधनकारक; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; 'ओटीपी' मात्र आवश्यक

घरगुती गॅस सिलिंडर चार दिवसांत घरपोच बंधनकारक; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; 'ओटीपी' मात्र आवश्यक


पुणे : घरगुती गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणांहून सिलिंडरचे वितरण पूर्ण बंद करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तेलकंपन्या आणि वितरकांना दिल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण केवळ ओटीपी प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून, गॅस बुकिंग केल्यानंतर चार दिवसांत (९६ तासांत) सिलिंडर घरपोच देणेही वितरकांना बंधनकारक करण्यात आले आहे. आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या 'एलपीजी' पुरवठ्याच्या टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्याची धास्ती नागरिकांमध्ये होती. 
घरगुती गॅस सिलिंडर पुरेसे असून, त्याची टंचाई नसल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतरही शहरात सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा सोमवारपर्यंत कायम होत्या. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने गॅस कंपन्यांकडून वितरण आणि साठ्याची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या, गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक झाली. त्या वेळी गॅस एजन्सी किंवा अन्य ठिकाणांहून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण पूर्ण बंद करण्याची सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केली.

'घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा केवळ ओटीपी प्रणालीद्वारेच करण्यात येणार आहे. तसेच, गोदाम, गॅस एजन्सी किंवा अन्य ठिकाणांहून सिलिंडरचे कोणतेही वितरण न करण्याची सूचना करण्यात आली आहे,' असे डुडी यांनी सांगितले. सर्व गॅस एजन्सींनी 'त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर गॅस सिलिंडरचे वितरण फक्त 'ओटीपी'द्वारेच चार दिवसांत घरपोच देण्यात येईल,' अशा आशयाचे फलक लावण्याची सूचनाही वितरकांना करण्यात आली आहे. तसेच, 'गॅस एजन्सीबाहेर गर्दी करू नये' असा संदेश मोबाईलवर पाठविण्यास वितरकांना सांगण्यात आले आहे.
गॅस बुकिंग केल्यानंतर चार दिवसांत घरपोच सिलिंडर देणे वितरकांना बंधनकारक करण्यात आले असून, नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलिंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या आणि गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलिंडर वितरणासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.