अल्पवयीन मुलींवरल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जामिनासाठी पुन्हा लग्नाचे अमिष दाखवित आहेत. या अमिषाने पीडित, कुटुंबातील व्यक्तींना फितुर होत असून त्याचा परिणाम खटल्यावर होत आहे. यामुळे कित्येकदा आरोपींची निर्दोष मुक्तता होते. जामीन अथवा निर्दोष मुक्ततेनंतर आरोपी लग्नाचा शब्द पाळत नसल्याचे दिसते.
त्यामुळे पहिल्यांदा लग्नाच्या अमिषाने बलात्कार, त्यानंतर जामिनासाठी लग्नाचे अमिष दाखवून आरोपी निर्दोष बनत दोनदा पीडितेची फसवणूक करत आहेत. मागील काही वर्षात जिल्ह्यातील न्यायालयात साडेसहा हजारहून अधिक बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पास्को) गुन्हे प्रलंबित आहेत. त्यापैकी शहरातील विशेष न्यायालयात साडेचार हजार प्रकरणांचा समावेश आहे.
यात १४ ते १८ वर्षातील मुलींवरील बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. लग्नाचे अमिष दाखवून कोवळ्या वयातील मुलींवर बलात्कार केला जातो. ही बाब उघडकीस आल्यावर आरोपी लग्नास नकार देतो. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आरोपीला अटक होते. त्यानंतर आरोपी जामिन मिळावा यासाठी कुटुंबिय फितूर होण्यासाठी अनेक अमिषे दाखविले जातात. पैसा, होणारी बदनामी आणि विशेषत: झाले गेले विसरून, पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगून पीडित, कुटुंबियांना सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो.
विशेष म्हणजे पीडिता फितूर होते. अनेकदा पीडिता गर्भवती राहिल्यावर लग्नाचे आमिष दाखवून गर्भपात केला जातो. मुलीचे लग्न होणार नाही, या भीतीने पालकही फितूर होत खोटी साक्ष देतात. तसेच योग्य वैद्यकीय पुरावा नसल्याने, अल्पवयीन असल्याचा जन्म दाखला नसल्याने खटल्याच्या निकालावर नकारात्मक परिणाम होतो. लग्नाचे आश्वासन मिळाल्यानंतर साक्ष आरोपीच्या बाजूने दिल्याने आरोपी निर्दोष सुटतो. अनेक प्रकरणांमध्ये हे आश्वासन पाळले जात नाही. बलात्कारावेळी एकदा आणि जामिनासाठी दुसऱ्यांदा आरोपी पीडितेला फसवत असल्याचे दिसते.
अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणात पीडित, कुटुंबिय फितुर होण्याची शक्यता असते. ज्यावेळी खटला सुरू असतो. त्यावेळी पीडित अल्पवयीन असते. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा सज्ञान मुलगी असल्यास खटल्यानंतर लग्न करण्यात येईल, असे सांगण्यात येते. तसे शपथपत्रही न्यायालयात दाखल केले जाते. काही प्रकरणात पीडितेचे इतर मुलाशी लग्न झालेले असते. तिचा संसार तुटेल, या भीतीने पालकन्यायालयात आणण्यास घाबरतात. या सर्व घटनांचा फायदा आरोपीला होण्याची शक्यता असते.
– ॲड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.