Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अविश्वास प्रस्ताव नामंजूर होताच ओम बिर्ला दोन दिवसांनी लोकसभेत आले अन्...

अविश्वास प्रस्ताव नामंजूर होताच ओम बिर्ला दोन दिवसांनी लोकसभेत आले अन्...



लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव गुरूवारी आवाजी मतदानाने नामंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर दोन दिवस १२ तासांहून अधिक काळ चर्चा झाली. यादरम्यान बिर्ला यांनी कामकाजात सहभाग घेतला आहे. प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी कामकाजाला सुरूवात केली. विरोधकांच्या गोंधळामुळे त्यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. पण त्यानंतर त्यांनी सुमारे ३० मिनिटे आपली भूमिका स्पष्ट केली.

ओम बिर्ला यांनी प्रामुख्याने सभागृहाचे कामकाज नियमांनुसार चालेल, त्यापेक्षा कोणताही सदस्य मोठा नाही, जे सदस्य नियम पाळणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेतले जातात, असे आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना न बोलू देण्याच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. बिर्ला म्हणाले, संसदीय कामकाजाच्या इतिहासात तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोधकांचा आवाज दाबणे आणि निष्पक्षतेवर आपली भूमिका मांडली. प्रत्येक सदस्याने नियमानुसार मुद्द्यांवर आपले विचार मांडावेत, असा माझा आग्रह असतो. त्यासाठी पुरेसा वेळ देण्याचाही प्रयत्न केला. जे सदस्य संकोच करतात किंवा बोलत नाही, त्यांनाही प्रेरित करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. मी दोन्ही कार्यकाळात वेळोवेळी अशा सदस्यांना चेंबरमध्ये बोलवून संसदेत बोलण्यासाठी प्रवृत्त केले.
हे सभागृह विचार आणि चर्चाचे जिवंत व्यासपीठ राहिले आहे. आज जगात संसदीय व्यवस्थाच शासन करण्याची सर्वश्रेष्ठ व्यवस्था आहे. मला या सभागृहाने दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी दिली. मी नेहमीच सभागृहाचे कामकाज निष्पक्षता आणि नियमांनुसार चालावे, यासाठी प्रयत्न केला. सभागृहात सर्वांना सोबत घेऊन सामंजस्याने कामकाज चालावे, यासाठी प्रयत्नशील राहिलो. सभागृहाची प्रतिष्ठा उत्तरोत्तर वाढवी, यासाठी प्रयत्न केला, असे बिर्ला म्हणाले.

मी नैतिकतेचा अवलंब करत सभागृहाच्या कामकाजापासून स्वतःला दूर ठेवले. चर्चेदरम्यान अनेक भावना, दृष्टीकोन मांडण्यात आले. मी प्रत्येक सदस्याचे म्हणणे गंभीरपणे ऐकले. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. लोकशाहीचे हेच वैशिष्टय आहे. इथे प्रत्येकाचे ऐकले जाते. हे आसन एका व्यक्तीचे नाही. इथे प्रत्येकाचे ऐकले जाते. हे आसन एका व्यक्तीचे नाही. लोकशाही परंपरा आणि महान संस्थेच्या प्रतिष्ठेचे प्रतिक आहे, अशी भावना बिर्ला यांनी व्यक्त केली.

काही सदस्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले जात नाही, बोलण्याची पुरेशी संधी दिली जात नाही. सभागृह नेता असो, विरोधी पक्षनेते असो किंवा कुणी मंत्री असो, कुणीही सदस्य असला तरी सर्व सदस्यांना नियमांनुसार, प्रक्रियेनुसार बोलण्याचा अधिकार आहे. काही सदस्यांचे म्हणणे होते की, विरोधी पक्षनेते सभागृहात मोठे असतात, कोणत्याही विषयावर बोलू शकतात. हा कुणालाही विशेषाधिकार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो, असे बिर्ला यांनी सांगितले.

सभागृह नियमानुसार चालते. हे नियम सर्व सदस्यांसाठी समान आहेत. लोकहिताच्या कोणत्याही विषयावर निवेदन करायचे असेल तर पंतप्रधान किंवा इतर सदस्यांनाही अध्यक्षांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. त्याबाबतची नोटीस दिल्यानंतरच ते बोलू शकतो. कोणत्याही सदस्याला नियम डावलून बोलण्याचा अधिकार सभागृहात नाही. जेव्हा काही सदस्य नियमांविरोधात चालतात तेव्हा मला कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
महिलांबाबत नेहमीच माझ्या मनात सन्मान राहिला आहे. महिलांना मी नेहमीच बोलण्यासाठी प्राधान्य दिले आहे. माझ्या अध्यक्षीय कार्यकाळात सर्व महिला सदस्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. पण काही महिला सदस्य ज्यापध्दतीने वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होत्या, फलक घेऊन आल्या होत्या, त्यामुळे अनुचित घटना घडू शकली असते. ते टाळण्यासाठी मी सभागृहाच्या नेत्यांना सभागृहात न येण्याचा आग्रह केला. अशा प्रतिकुल स्थितीत सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी जे योग्य होते, ते मी केले, असेही बिर्ला यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.