इंधन टंचाईच्या अफवांनी उडाली खळबळ; गॅस एजन्सींवर नागरिकांच्या तुफान रांगा..सत्य काय आहे?
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा पुरवठा खंडित होणार असल्याच्या अफवांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अनेक भागांतील एलपीजी गॅस एजन्सी आणि सिलिंडर वितरण केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र रविवारी (दि. ८) दिसून आले. त्यामध्येच शनिवारी (दि. ७) गॅस दरामध्ये वाढ झाल्याने इंधन पुरवठा बंद होऊन शहरामध्ये गॅस सिलेंडर मिळणार नाही अशा अफवा समाजमाध्यमांवर पसरू लागल्या आहेत. त्याला बळी न पडता नागरिकांनी वितरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि युद्धामुळे जागतिक इंधन बाजारावर परिणाम होऊ लागल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
या अफवांचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातही दिसून येत आहे. अनेक नागरिकांनी सिलेंडरची आगाऊ नोंदणी करण्यासाठी गॅस एजन्सीकडे धाव घेतली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी अतिरिक्त सिलेंडर मिळविण्याचा प्रयत्न केल्याने एजन्सीसमोर रांगा लागल्या. विशेषतः चिखली, आकुर्डी, निगडी, वाकड, थेरगाव आणि पिंपरी परिसरातील गॅस केंद्रांवर सकाळपासून नागरिकांची वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, युद्धाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही ठिकाणी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काही प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर थांबवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र गॅस वितरक संघटनांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशात पुरेसा गॅस आणि इंधन साठा उपलब्ध असून तातडीने कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, असे पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त सिलेंडर साठवू नयेत, अन्यथा वितरण व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपुऱ्या माहितीमुळेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अफवा आणि वाढलेल्या दरांमुळे शहरातील नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून गॅस केंद्रांवरील गर्दी प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरू लागली आहे.
पेट्रोलपंपांवरही रांगा
युद्धाच्या परिणामामुळे पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी गॅस देखील मिळणार नाही अशी अफवा समाजमाध्यमांवर पसरली आहे. त्यामुळे इंधन मिळाले नाही तर वाहने कशी चालवायची अशी भीती नागरिकांना सतावते. त्यामुळे आपल्या वाहनामध्ये इंधन भरून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
पंपावर टाकी फूल करून द्या असे नागरिक म्हणत आहेत. तर काहीजण ड्रममध्ये पेट्रोल, डिझेल भरून देण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्याला पंपावरील कर्मचारी विरोध करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पंपावरील कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद देखील होत आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये इंधन साठा पुरेसा आहे. पंपचालकांना इंधन देण्यासाठी आगाऊ रक्कम घेण्यात येणार होती. मात्र, तो निर्णय देखील मागे घेण्यात आला आहे. त्याबाबतची घोषणा सोमवारी होईल. त्यामुळे, सर्व पंपचालकांना पुरेसे इंधन मिळणार आहे. परिणामी, नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्याची आवश्यकता नाही. तसेच अशाप्रकारे साठा करणे धोकादायक आहे.
– अली दारुवाला, सदस्य, राष्ट्रीय कोअर कमिटी ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
.jpeg)