पोलिस भरतीच्या उंची मोजमापात गोंधळ! एका पदासाठी पात्र, तर दुसऱ्यासाठी अपात्र, उमेदवारांचा उसळला संताप
पुणे: 'आई-वडील शेतमजुरी करतात. मी गेल्या तीन वर्षांपासून नोकरी करत पोलिस भरतीची तयारी करत आहे. कोल्हापूरहून मोठ्या आशेने पुण्यात आले; पोलिस बँड्समन आणि पोलिस शिपाई अशा दोन पदांसाठी अर्ज केला. बँड्समनसाठी उंची १५५ सेंटिमीटर भरल्याने मी पात्र ठरले, मात्र शिपाई पदासाठी तीच उंची १५४.०४ सेंटिमीटर भरल्याने अपात्र ठरवण्यात आले,' ही भावना आरती वाघमारे (नाव बदललेले) या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
'एकाच मैदानावर माझी उंची वेगवेगळी कशी असू शकते? पोलिस प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून, माझी संधी हिरावली जात आहे,' असेही त्या विद्यार्थिनीने म्हटले. आरतीची ही व्यथा आज पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयावर जमलेल्या शेकडो उमेदवारांची प्रातिनिधिक भावना ठरते आहे. राज्याच्या गृह विभागामार्फत १६ हजार ८०० पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जात असून, राज्यभरातून सुमारे १६ लाख अर्ज आले आहेत.
पुणे शहर पोलिस दलातील सुमारे दोन हजार जागांसाठी तब्बल एक लाख ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) यांच्या मैदानावर १६ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीत उंची मोजण्याच्या यंत्रणेत मोठा घोळ असल्याचा आरोप शेकडो विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिस प्रशासनाकडून उंची मोजण्यासाठी मानवी हस्तक्षेप नसलेली अत्याधुनिक यंत्रे वापरली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, वास्तवात एकाच उमेदवाराची उंची वेगवेगळ्या पदांसाठी मोजताना त्यात १ ते अडीच सेंटिमीटरची तफावत दिसून येत आहे.चार ते पाच दिवसांच्या अंतराने मोजमाप केल्यास उंची कमी-जास्त भरत असल्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागितली असता, विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. हा तांत्रिक गोंधळ केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. एका विद्यार्थिनीची उंची अकोला जिल्हा पोलिस भरतीत १५४.५ सेंटिमीटर भरली, तर अवघ्या दोन दिवसांनंतर यवतमाळ येथे तीच उंची १५१ सेंटिमीटर भरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आम्ही
रात्रंदिवस एक करून आणि गरिबीशी संघर्ष करत, अनेक वर्षे भरतीची तयारी
करतो. मात्र, अत्याधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या या सदोष यंत्रांमुळे आमच्या
आयुष्याशी खेळ सुरू आहे. एकाच मैदानावर एका पदासाठी उंची भरते आणि
दुसऱ्यासाठी कमी कशी होऊ शकते? प्रशासनाने हा तांत्रिक घोळ त्वरित थांबवून
अपात्र ठरलेल्या आम्हा उमेदवारांना शेवटची एक संधी द्यावी.
- एक विद्यार्थी
उंची
मोजण्याच्या सदोष यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरशी नाहक खेळ सुरू
आहे. प्रशासनाने तत्काळ ही यंत्रे दुरुस्त करावीत किंवा बदलावीत. या
तांत्रिक गोंधळात अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी भरतीच्या
शेवटच्या दिवशी पुन्हा एक संधी मिळावी.
- विठ्ठल बडे, विद्यार्थी समन्वय समिती
संबंधित विद्यार्थिनीची उंची १५५ सेंमी नसल्याची आम्ही तीनवेळा मोजणी करून खात्री केली. शासनाने दिलेल्या २.५ सेंटिमीटर शिथिलतेमुळे ती बँड्समन पदासाठी पात्र ठरते; मात्र पोलिस शिपाई पदासाठी आवश्यक निकषांनुसार ती अपात्र आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते. ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला, त्यांनी त्यांचे तपशील पोलिस प्रशासनाला सादर केल्यास प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करता येईल. पोलिस प्रशासनाकडून कोणावरही अन्याय होणार नाही.- संजय पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, प्रशासन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.