मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची विश्रांती, दुखण्याबद्दल दिली माहिती
पुणे: भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुस्ती खेळताना २९ वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीचा त्रास पुन्हा उद्भवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचं सुचवलं. नुकतीच्या मोहोळ यांच्या पायावर ही शस्त्रक्रिया पार पडली. परिणामी आता त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. मोहोळ यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर येथे २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत आणि या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. मात्र इतकी वर्षे या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला होता. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं मला सांगितलं. त्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात आली," असं त्यांनी सांगितलं आहे.
किमान एक महिना घ्यावी लागणार विश्रांती
शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही मला पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन आणि कामानिमित्त होणारा देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क आणि इतर कामे. तसंच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय," अशा भावनाही मंत्री मोहोळ यांनी बोलून दाखवल्या आहेत.दरम्यान, "मला माहीत आहे की, तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेत हजर होईन, तेही पहिल्यापेक्षा जास्त जोमाने," असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.