पुणे :- आधी वाटलं साधं पान दुकान, पण झडती घेताच पोलिसांचेही डोळे विस्फारले! दोघांना बेड्या ठोकून बाहेर काढलं
लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात पानशॉपच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पान विक्रीच्या आडून नशेचा काळा बाजार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील मैफील पानशॉपवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. तपासादरम्यान पोलिसांना अंमली पदार्थ मिसळलेली पाने आणि इतर साहित्य आढळून आले. या कारवाईत सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पान विक्रीच्या माध्यमातून तरुणांना नशेच्या विळख्यात ओढले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी मोबाईल टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता या पानांमध्ये अॅम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स आणि ओपिएट्ससारखे अंमली पदार्थ मिसळले जात असल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या 35 रुपयांत मिळणाऱ्या एका पानाची नशा अत्यंत तीव्र असल्याचेही तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही पाने खाल्ल्यानंतर दारू किंवा सिगारेटसारखा कोणताही वास येत नाही. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांनी नशा केल्याचे सहज लक्षात येत नाही.या प्रकरणी पोलिसांनी दुकानमालक निशांत काळभोर (वय 19) आणि कामगार रामजी पटेल (वय 33) यांना अटक केली आहे. तर रोहित जवळकर हा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पूर्व हवेली परिसरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नशेची पाने विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज आणि हॉस्टेल परिसरातील पानटपऱ्यांवर ही विक्री वाढत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या कारवाईनंतर परिसरातील इतर पान विक्रेत्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
