Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गॅस सिलिंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा भोवळ येऊन मृत्यू

गॅस सिलिंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा भोवळ येऊन मृत्यू


अकोला : राज्यात गॅस सिलिंडर टंचाईमुळे पहिला बळी गेला आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या माजी सरपंच यांचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी अकोला जिल्ह्यात घडली. या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले.

सिलिंडरसाठी मोठमोठ्या रांगा; नागरिक त्रस्त

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचे गंभीर परिणाम राज्यात उमटले आहेत. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने सर्वत्र ओरड सुरू आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना चांगला संघर्ष करावा लागतो. गॅसचा तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. उन्हाचा पारा चांगलाच चढला असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे रहावे लागते. तप्त उन्हात गॅस सिलिंडरसाठी चांगलाच संघर्ष करावा लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

रांगेत उभे वृद्ध भोवळ येऊन कोसळले
अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे गॅस टंचाईमुळे धक्कादायक प्रकार घडला. गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट असे मृतकाचे नाव आहे. यदुराज गॅस एजन्सी येथे सिलिंडरचा क्रमांक लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली.
प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप

या प्रकारामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. सिलिंडर टंचाई व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा बळी गेल्याचा आरोप केला जात आहे. शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे अन्वी मिर्झापूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर टीका
अकोला जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत उभ्या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेवर कठोर टीका केली. ते म्हणाले, गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.