Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही



पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशासेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना संसार कसा चालवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून दररोज १२ तास काम करून घेतले जात आहे, शासनाच्या आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. पण मानधन मिळत नसल्याने आशासेविका हवालदिल झाल्या आहेत. शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबविण्यासाठी आणि शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आशासेविकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणे, गर्भवती महिलांची नोंदणी करणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, नवजात बालक आणि मातांची काळजी घेणे तसेच विविध साथीच्या आजारांबाबत माहिती देणे, अशा अनेक जबाबदारी आशा सेविका पार पाडतात. कोरोना, स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या काळातही या सेविकांनी मोठ्या प्रमाणावर काम केले होते.


सेविकांवर आर्थिक संकट

एवढे महत्त्वाचे काम करूनही गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला निधी प्राप्त होतो. पण हा निधी न मिळाल्याने मानधन देता आलेले नाही. आम्ही पाठपुरावा करत आहोत असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मानधनाअभावी अल्प उत्पन्न गटातील आशासेविकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दरमहा ९५०० रुपये तुटपुंजे मानधन

आशासेविका सकाळी सात ते सायंकाळी सात असे जवळपास १२ तास काम करतात. त्यांना दररोज किमान ५० घरांना भेटी देणे आवश्‍यक असते. या कामासाठी त्यांना प्रति महिना सुमारे नऊ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळते. कामाच्या तुलनेत हे मानधन अपुरे असताना त्यात वाढ करावी, अशी मागणी आशा सेविकांची आहे. ही मागणी मान्य करण्याचे तर सोडाच पण केलेल्या कामाचाही मोबदला मिळण्यास पाच महिने थांबावे लागत आहे.

आशासेविकांचे मानधन महापालिका देत नाही, तर राज्य शासनाकडून दिले जाते. पण महापालिकेला ही रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. रक्कम मिळताच मानधन दिले जाईल.

- पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

मी दररोज १२ तास काम करते. घरोघरी आम्हाला फिरून गर्भवती महिलांची नोंदणी, लसीकरण यांसह अन्य कामे करावी लागतात. पण गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. अनेकदा पाठपुरावा केला तरीही रक्कम जमा झालेली नाही. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी केलेल्या कामाचाही भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही.

- एक आशासेविका




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.