जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आधी दारू पाजली, तरुण नशेत गेल्यावर निर्घृणपणे संपवलं, सांगलीत भयानक घटना
सांगली : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका ३० वर्षीय तरुणाला घरात बोलावून, त्याला दारू पाजून आणि त्यानंतर डोक्यात दगड व काठीने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा येथे घडली आहे.
या भीषण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जुना वादावरुन घटना
संदेश उर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. वाळवा, माळभाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक भीमराव कदम (वय ६०) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश कदम आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता. आज २९ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, वाळवा ते आहेरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ राहणाऱ्या राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या घरी संशयितांनी संदेशला बोलावून घेतले.
नशेत असताना हल्ला
प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजीत उर्फ सोन्या टूमक्या परीट आणि राजश्री कोळी या तिघांनी संगनमत करून संदेशला प्रथम दारू पाजली. तो नशेत असतानाच पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला.आरोपींनी काठीने आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम मारहाण करत त्याचा अत्यंत क्रूरपणे खून केला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊनटाकण्यात आला.
गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप शितोळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.