दैनिक ललकारचे कार्यकारी संपादक कर्णधार ऋषिकेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा वॉरिअर्सने कोरले 'एसपीएमएल चषक २०२६' वर नाव प्रतापगड रॉयल्स उपविजेता; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचे दोन दिवसीय फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळणारे दै. ललकारचे कार्यकारी संपादक कर्णधार ऋषिकेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा वॉरिअर्स संघाने 'एसपीएमएल चषक २०२६' वर नाव कोरले आहे.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 'एसपीएमएल' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरार पाहायला मिळाला. षटकार, चौकारांच्या आतषबाजीने सामन्याची उत्कंठा वाढीस गेली होती. अखेर पन्हाळा वॉरिअर्स संघाने एक षटक आणि सात गडी राखून प्रतापगड रॉयल्स संघाचा पराभव करत चषकावर नाव कोरले. प्रतापगड रॉयल्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
'एसपीएमएल' चषक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात सहा संघ सहभागी झाले होते. 'अ' गटातून पन्हाळा वॉरिअर्स आणि शिवनेरी टायगर्स या दोन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर 'ब' गटातून प्रतापगड रॉयल्स आणि सिंहगड किंग्स संघांनी उपांत्य फेरी गाठली. पहिल्या उपांत्य सामन्यात पन्हाळाने सिंहगडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात २ बाद ५९ धावा केल्या. परंतु धावांचा पाठलाग करताना सिंहगडने ३ बाद ५२ धावांपर्यंतच मजल मारली. सात धावांनी विजय मिळवत पन्हाळा वॉरिअर्सने अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवनेरी संघाने प्रतापगडविरुद्ध सहा षटकात ३ बाद ७२ धावा केल्या. प्रतापगड संघाने पाठलाग करताना पाचव्या षटकात लक्ष्य गाठत ९ गडी राखून सामना जिंकला.
स्पर्धेत एकही सामना पराभूत न झालेले पन्हाळा वॉरिअर्स विरुद्ध प्रतापगड यांची अंतिम सामन्यात गाठ पडली. पन्हाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या प्रतापगड संघाने चौकार, षटकारांची आतषबाजी करत सात षटकात सहा बाद ७९ धावा करत पन्हाळा संघासमोर तगडे आव्हान ठेवले. सदाशिव चुरी याने दहा चेंडूत २५ धावा केल्या. त्याला अरुण लोंढे (१२ धावा), अर्जुन जगताप (११), निलेश माटले (१३) यांनी साथ दिली. वैभव कोले, स्वप्निल एंडोलीकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शरद सातपुतेने एक बळी घेतला. ८० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पन्हाळा वॉरिअर्सच्या अर्जुन यादव याने स्फोटक खेळी करताना अवघ्या १४ चेंडूत ४ षटकार, ४ चौकार फटकावत नाबाद ५१ धावा केल्या. त्याला शरद सातपुते, स्वप्निल एंडोलीकरने साथ दिली. एक षटक बाकी असतानाच सात गडी राखून ३ बाद ८० धावा करत चषकावर नाव कोरले.राष्ट्रवादी (शरद पवार) चे नेते शेखर माने, सांगलीवाडीचे नगरसेवक अभिजीत कोळी यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक दिला. यावेळी बिझनेस मंत्राचे अभिजीत फडके, पूजा फडके, लोकमतचे आवृत्तीप्रमुख अविनाश कोळी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विकास सूर्यवंशी यांच्याहस्ते स्पर्धेतील सामनावीरांना वैयक्तिक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून जयंत तांबेकर, शिवराम घस्ते यांनी तर गुणलेखक सार्थक पेटकर यांनी काम पाहिले. यांनी पटकावला बहुमान: स्पर्धेतील मालिकावीरसह उत्कृष्ट फलंदाजीचा बहुमान अभिजीत बसुगडे (प्रतापगड) याने मिळवला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अरुण लोंढे यांना सन्मानित केले.मागील वर्षी सेमीफायनलमध्ये षटकार हुकला; यंदाच्या वर्षी विजेतेपदाला गवसनीमागील वर्षी पन्हाळा वॉरिअर्सचे उपकर्णधार ऋषिकेश खराडे यांनी मागील वर्षी सेमीफायनल सामन्यात अखेरच्या चेंडूवर ६ धावा आवश्यक असताना मारलेला षटकार सीमेवर झेल बाद झाले होते. यावर्षी त्यांना पहिल्यांदाच कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली. संपूर्ण संघाला योग्य मार्गदर्शन करून सलग ४ सामने जिंकले. तसेच ज्यावेळी फलंदाजीची संधी आली तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व अखेरच्या सामन्यात विरोधी संघाचे कर्णधार अभिजीत बसुगडे धोकादायक ठरत असताना त्यांनी उत्कृष्ट झेल घेतल्याने पुढील संघाला मोठी मजल मारता आली नाही. मागील वर्षी हुकलेली संधी यावर्षी चषक जिंकून त्यांच्या जिद्दी व संयमी नेतृत्व गुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

