सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू; वनक्षेत्रपाल पारधी निलंबित, आमदार देशमुखांच्या मागणीनंतर वनमंत्र्यांची कारवाई
शिराळा(सांगली) : बिऊर (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या राजवीर हणमंत पाटील या सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल वनक्षेत्रपाल (शिराळा) एकनाथ पारधी यांना निलंबित करण्यात आले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ही कारवाई केली. आमदार सत्यजित देशमुख यांनी पारधी यांना निलंबित करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
बिबट्याबाबत आमदार देशमुख यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. वनमंत्री गणेश नाईक यांनी त्याला उत्तर देत सरकार बिबट्याचा बंदोबस्तासाठी उपाययोजना करत असल्याचे सांगितले. देशमुख यांनी बिबट्याचे मनुष्यावर होणारे हल्ले, मानवी वस्ती व शेत, रानात असलेला वावर यासह बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सरकार काय कार्यवाही करणार याबाबत लक्षवेधी मांडत सरकारचे लक्ष वेधले होते.
देशमुख म्हणाले, ''बिऊर येथे बिबट्याने लहान बालक राजवीर पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील राजवीरच्या मृत्यूनंतर लोकांत मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण झाला होता. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या घटनेस कारणीभूत असणारे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांना निलंबित करावे, अशी मागणी होती.
वनमंत्री नाईक म्हणाले, ''राजवीर पाटील या बालकाच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. त्यास जबाबदार अधिकारी असणाऱ्या वनक्षेत्रपाल पारधी यास निलंबित करण्यात येत आहे. बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीबाबत केंद्रीय वन मंत्रालयाशी संपर्क सुरू असून वन्यजीव विभागाकडून परवानगी घेतली जाईल.
पुणे जिल्ह्यातील शिरूर व जुन्नर परिसरातील बिबट्या हटवण्यासाठी वन विभागाने जो प्रयोग केला तो सांगली जिल्ह्यात ठिकाणी देखील राबवला जाईल. बिबट्या प्राण्याला शेड्यूल एक मधून शेड्युल दोनमध्ये आणण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल.
देशमुख यांनी केलेल्या मागण्या
बिबट्याचे निर्बीजीकरण करावे.
बिबट्या पकडण्याची परवानगी मुख्य वनसंरक्षकाना द्यावी.
बिबट्या शेड्यूल एकमधून दोनमध्ये घेतल्यास मारण्याची परवानगी मिळेल.
बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे बसवण्याची परवानगी द्यावी.
बिबट्याचा हल्ला झाल्यास नियम तीन एक प्रमाणे नुकसान भरपाई मिळते. पण नियम तीन दोन प्रमाणे अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही, हल्ला असो वा अपघात या दोन्ही घटनांसाठी नुकसान भरपाई मिळावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
