Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! तीनदा विष दिलं, नंतर स्कुटीचा अपघात घडवला; शिक्षिकेच्या पतीचं कटकारस्थान पाहून महाराष्ट्र हादरला

धक्कादायक! तीनदा विष दिलं, नंतर स्कुटीचा अपघात घडवला; शिक्षिकेच्या पतीचं कटकारस्थान पाहून महाराष्ट्र हादरला


एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षिका पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. किलरला एक लाखाची सुपारी दिली आणि नंतर अपघाताचा बनव केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पातुर्डा या गावात घडली आहे.

वृषाली प्रकाश गावंडे मृत शिक्षिकेचं नाव आहे. तर आरोपी पतीनं नाव प्रकाश गावंडे आहे. प्रकाश गावंडे याने साथीदार मंगेश चुलकार यांच्या मदतीने वाहन चालक मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा अपघात घडवला होता. दुचाकी अपघात हा प्रत्यक्षात नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी त्या शाळेवर ड्युटीला जात असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्कुटीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक याठिकाणी पोहोचले.

तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे रडत बसले होते. पत्नीचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. गावातील लोक देखील या घटनेने हळहळले होते. मनाला चटका लावणारी घटनेने सर्वजण हादरून गेले होते. परंतु या अपघातामागे मोठं कटकारस्थान असेन असं कोणाला वाटलं नव्हतं.

इतकेच काय पोलिसांनाही हा अपघातच वाटत होता. मात्र नंतर थोडी चौकशी केल्यानंतर पोलिसांना घातपाताची शंका आली. वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी अशी शंका पोलिसांना बोलून दाखवली होती. तेव्हा जळगाव जामोद पोलिसांनी या सगळ्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्याआधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले.

मंगेश सूर्यवंशी याची चौकशी केल्यानंतर वृषाली गावंडेंचा पती प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणायला लावल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहूळकर या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकअप चालक मंगेश सूर्यवंशी याला एक लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवला.

वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केलं. जळगाव - जामोद पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून काही तासातच तीनही आरोपींना गजाआड केलं व न्यायालयासमोर हजर केलं असता काल तिन्ही आरोपीना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.