सांगली : अडीच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा झालेल्या महापालिकेच्या सभेत प्रशासकीय कामकाजावर तीव्र आक्षेप घेत प्रशासकीय ठराव विखंडित करण्याची आग्रही मागणी सदस्यांनी केली. महापौर धीरज सुर्यवंशी यांनी सदस्यांच्या भावना विचारात घेउन पथदिव्याचे काम करत असलेल्या समुद्रा कंपनीचा लेखाजोखा करण्यासाठी समिती नियुक्तीची घोषणा केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि पथदिव्याबाबत सदस्यांनी आग्रही भूमिका घेतली. प्रशासकीय कालावधीत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप करत तब्बल सहा तास चाललेल्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. समुद्रा कंपनीने करार करतेवेळी वीज देयक कमी होईल असा शब्द दिला होता. मात्र, अनेक मार्गावर पथदिवे नसल्याचे आढळून येत असताना वीज देयकांवरील खर्च मात्र वाढत आहे. याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. यावर कंपनी प्रतिनिधींना बोलावून खुलासा करण्याची सूचना महापौरांनी केली. मात्र, कंपनी प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महापौर, उपमहापौर, गटनेते, आणि तज्ञ यांची समिती नियुक्त करून कंपनीच्या कामाची पडताळणी करण्यात येईल असे महापौर सुर्यवंशी यांनी सांगितले.
प्रशासकीय कालखंडात काही विषय वादग्रस्त असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी वादग्रस्त ठराव विखंडित करण्याची मागणी केली.या मागणीला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अभिजित भोसले यांनी पाठिंबा दर्शवला. यावर महापौरांनी पाणी पुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्याची तयारी दर्शवली. या सभेत हनुमानगरमध्ये उभारण्यात येणार्या ३० कोटी खर्चाच्या नवीन नाट्यगृह बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.या सभेत स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे पद्मश्री पाटील, मालूश्री खोत, मोहन वाटवे, गणेश माळी, अतुल माने, उदय बेलवलकर, स्वाती शिंदे, कीर्ती देशमुख, काँग्रेसचे बबीता मेंढे, स्मिता यमगर, दिपाली पाटील, मयूर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अभिजीत भोसले, शिरीन पिरजादे, मैनुद्दीन बागवान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सुरेश बंडगर यांचा समावेश आहे.
महिला व बालकल्याण समितीमध्ये विद्या नलवडे, रईसा शिकलगार, बानू जमादार, योगिता राठोड, रोहिणी पाटील, मीनाक्षी पाटील, वैशाली गवळी, लक्ष्मी सरगर, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव, मुब्बशिरिन बागवान, बिलकिस बुजरूक, अश्विनी कदम, नसिमा नाईक, अश्विनी कोळी, रेश्मा चौधरी यांचा समावेश आहे. समाजकल्याण समितीमध्ये रवींद्र सदामते, प्राजक्ता धोतरे, उज्वला कांबळे, दीपक वायदंडे, गीता पवार, मनीषा कुकडे, गाथा काळे, अलका ऐवळे, सागर वनखंडे, रमेश सर्जे, रेखा कांबळे यांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.