Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ


सांगली : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आशादायी चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सवात एकूण १८,२८१ दाखल पात्र विद्यार्थ्यांपैकी ११,१४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ही टक्केवारी ६०.९४ इतकी नोंदली गेली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता ओढा या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने 'माझी शाळा आदर्श शाळा' या उपक्रमांतर्गत यंदाचा प्रवेशोत्सव अधिक आकर्षक व विद्यार्थीकेंद्री केला. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चिमुकल्यांचे औक्षण, पाटीपूजन, पुस्तकांची गुढी, सरस्वती पूजन, तसेच फुले-फुगे देऊन स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 'पहिल्या पावलांचे ठसे' घेऊन संस्मरणीय क्षण नोंदवण्यात आले.

"जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया आहेत. तज्ज्ञ शिक्षक, डिजिटल साधने, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकास यावर आमचा भर आहे. पालकांनी जिल्हा परिषद शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा प्रवेश येथे निश्चित करावा,"
– मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल नरवाडे

"नवीन विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन उद्यापासून सुरू होणार आहे. १ मेपर्यंत सातत्याने मार्गदर्शन केले जाणार असून अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचा समन्वय साधून हा उपक्रम राबवला जात आहे. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढेल, असा विश्वास आहे. पुढील आठवडाभर प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे,"
– मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी
प्रतिसाद असा

विटा, तासगाव, कडेगाव आणि शिराळा या तालुक्यांनी प्रवेशोत्सवात आघाडी घेतली असून या भागात पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे अधिक विश्वास दिसून आला.आटपाडी, जत आणि मिरज या तालुक्यांमध्ये सरासरी प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी प्रवेश वाढीसाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.पलूस, कवठेमहांकाळ आणि वाळवा या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी प्रतिसाद नोंदला गेला. विशेषतः वाळवा तालुका सर्वात कमी प्रतिसाद असलेला ठरला.

वाढता विश्वास, वाढती टक्केवारी
२०२४-२५ : ५१.४०%
२०२५-२६ : ५४.३४%
२०२६-२७ : ६०.९४%
तीन वर्षांत तब्बल १०% वाढ
जिल्हा परिषद शाळांची वैशिष्ट्ये
तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक
ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय साहित्य
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
क्रीडा, सांस्कृतिक व कौशल्य विकास उपक्रम
सुरक्षित वातावरण व CCTV सुविधा
RO पाणी, स्वच्छ शौचालये
हरित व आनंददायी शाळा परिसर
'प्रवेशोत्सव'ची वैशिष्ट्ये

वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
पाटीपूजन व सरस्वती पूजन
पुस्तकांची गुढी उभारणी
फुले-फुगे देऊन स्वागत
'पहिल्या पावलांचे ठसे' उपक्रम
पालक जनजागृती अभियान
एकूणच, सांगली जिल्ह्यातील गुढीपाडवा प्रवेशोत्सवाने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला नवसंजीवनी दिली असून, जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.