खरशिंग (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील श्रीराम मंदिर व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिर, श्रीक्षेत्र दंडोबा पायथा येथे दि. 19 मार्च ते 26 मार्च 2026 या कालावधीत श्रीरामनवमी उत्सवाचे पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.अशी माहिती ट्रस्टी प्रदिप सव्वाशे,संगीता सव्वाशे यांनी दिली.
उत्सवाच्या कालावधीत दररोज पहाटे 5.30 वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होणार असून दुपारी 12.15 वाजता महाआरती व महाप्रसाद, तसेच सायंकाळी 7.15 वाजता आरती व प्रसाद असा नित्यक्रम राहणार आहे. या सातही दिवसांत भजन, कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक विधींमुळे परिसरात अखंड नामस्मरणाचे वातावरण निर्माण होणार आहे.
उत्सवाची सुरुवात गुरुवार, 19 मार्च रोजी अभिषेक, गुढी उभारणे व रामनवरात्र स्थापनेने होईल. शुक्रवार, 20 मार्च रोजी ‘गीत रामायण’ कार्यक्रमासह ह.भ.प. कु. वेदश्री सुहास जोशी (सांगली) यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार, 21 मार्च रोजी भजन सेवा व वंदना कापरे (पुणे) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
रविवार, 22 मार्च रोजी ‘रामनाम तारक होम’ हा विशेष धार्मिक विधी पार पडणार असून या विधीसाठी भाविकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोमवार, 23 मार्च रोजी भजन सेवा व अंकुश अडसुळे (समडोळी) यांचा भावगीत-भक्तीगीत कार्यक्रम होईल. मंगळवार, 24 मार्च रोजी भजन सेवा व ह.भ.प. गजानन काणे (ऊगार) यांचे कीर्तन, तर बुधवार, 25 मार्च रोजी भजन सेवा व पराग घळसासी (सांगली) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.उत्सवाचा समारोप गुरुवार, 26 मार्च रोजी श्रीरामनवमी निमित्त विशेष कार्यक्रमांनी होणार आहे. यावेळी सकाळी 9.00 वाजता ब्रह्मचैतन्य नगरी व मोफत दवाखान्याच्या फलकाचे अनावरण करण्यात येणार असून सकाळी 10.30 वाजता सौ. प्रज्ञा बडवे (पंढरपूर) यांचे कीर्तन होणार आहे. या उत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवा द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भजन, कीर्तन, नामस्मरण व विविध धार्मिक कार्यक्रमांनी समृद्ध अशा या उत्सवामुळे खरशिंग परिसरात आध्यात्मिक चेतना जागृत होणार असून भाविकांना भक्तीमय वातावरणात पुण्यलाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.