अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर झाला असून संपूर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या भारतातही एलपीजीचा तुटवडा निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात देशभरातील हॉटेल व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ किलोवरून १० किलो केले जाणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यावर आता अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, "घरगुती एलपीजी सिलिंडरचे वजन कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. नागरिकांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. देशातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा सामान्यपणे सुरू आहे." मध्य पूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो. त्यामुळे भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असून, घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सरकारने घरगुती सिलिंडरच्या वजनात घट करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.देशातील इंधन स्थितीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आश्वस्त केले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणारी जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली असली तरी, भारत आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण आता २७ ऐवजी ४१ देशांकडून इंधन आयात करत आहोत." महत्त्वाचे म्हणजे, भारताकडे सध्या ५३ लाख मेट्रिक टन धोरणात्मक तेलसाठा असून तो ६५ लाखांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. तसेच देशांतर्गत एलपीजीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. इंधन आयातीसाठी केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता इतर देशांकडूनही पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.