कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका खळबळजनक प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात चक्क आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी आता पोलिसांत धाव घेण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, करवीरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनसे पदाधिकारी प्रसाद पाटील यांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील दवाखान्यांच्या परवानगीची अधिकृत यादी मागवली होती. या यादीची पडताळणी करत असताना बालिंगा येथील एका दवाखान्याला तांत्रिक त्रुटी असूनही परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.हा वाद केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचे रूपांतर गंभीर धमकावणीत झाले. संबंधित दवाखान्याच्या डॉक्टरांसह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रसाद पाटील यांनी दमदाटी केल्याचा दावा डॉ. मदने यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. इतकेच नाही तर, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली असून, या शिवीगाळीची एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या होम ग्राऊंडवरच खळबळ
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच थेट तालुका आरोग्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकावले गेल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. करवीर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डॉ. मदने यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. आता या गंभीर आरोपानंतर पोलीस संबंधित मनसे पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करतात आणि मनसे यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.