Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली राष्ट्रवादीत राडा: गटनेत्यांनी 'स्वीकृत' पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्याचा आरोप; थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार!

सांगली राष्ट्रवादीत राडा: गटनेत्यांनी 'स्वीकृत' पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्याचा आरोप; थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार!


सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर गंभीर आरोप करत, स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पक्षश्रेष्ठींचा आदेश धाब्यावर?
दिगंबर जाधव यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या नावासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून अधिकृत शिफारस पत्र आले होते. असे असतानाही गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून ऐनवेळी दुसऱ्या नावाचा प्रस्ताव दिला. "केवळ आर्थिक उलाढालीतून माझे नाव कापण्यात आले," असा थेट आरोप जाधव यांनी केला आहे.
अशोक मासाळे यांच्या निवडीवर आक्षेप

ज्या अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली, त्यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधला. मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता. त्यांचा पक्षाशी कोणताही जुना किंवा थेट संबंध नाही. अशा व्यक्तीला संधी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली आहे. मोठी आर्थिक उचल घेऊन आपले नाव कापले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असल्याचे सांगत, त्यांनी बागवान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेणार
या प्रकारानंतर दिगंबर जाधव कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार दोन्ही जिल्हाध्यक्ष, नेते संजयकाका पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे. गटनेत्यांनी पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. निवड प्रक्रियेच्या तोंडावर राष्ट्रवादीतील ही गटबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप चव्हाट्यावर आल्याने पक्षश्रेष्ठी आता काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.