Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे भारताची प्रतिमा मलिन; संभाव्य अध्यक्षांनी डागले टीकास्त्र"

"ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे भारताची प्रतिमा मलिन; संभाव्य अध्यक्षांनी डागले टीकास्त्र"


अमेरिकेचे जपानमधील माजी राजदूत आणि २०२८ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार रहम इमॅन्युएल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. ज्याप्रकारे अमेरिकेकडून भारताला वागणूक दिली जात आहे, ती त्यांच्या तोंडावर थुंकण्यासारखी आहे, असे इमॅन्युएल यांनी म्हटले आहे. 
नुकतेच ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प सातत्याने भारताला लक्ष्य करत आले आहेत. यावर आता डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे. रहम इमॅन्युएल यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या प्रशासनात विविध पदांवर काम केले होते. 
इमॅन्युएल म्हणाले की, मागच्या ३० वर्षांत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही राजवटीत भारताशी जवळचे संबंध निर्माण करण्याच प्रयत्न झाले. "ट्रम्प यांच्या प्रशासन काळात अमेरिकेकडून भारताच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार झाला आहे. मागच्या ३० वर्षात प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने भारताला जवळ करण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी जे केले, ते मी कधीही करणार नाही", असे विधान इमॅन्युएल यांनी हारवर्ड केनेडी शाळेतील एका कार्यक्रमात बोलत असताना केले.



रहम इमॅन्युएल कोण आहेत?
इलिनॉय राज्याचे एकेकाळचे काँग्रेसमन आणि वॉशिंग्टनमध्ये सर्वपरिचित असलेले ६६ वर्षीय रहम इमॅन्युएल अमेरिकेतील एक वरिष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी २००६ च्या मध्यावधीमध्ये डेमोक्रॅट्सला मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न म्हणून इमॅन्युएल यांच्या २००६ च्या कामगिरीकडे प्रेरणा म्हणून पाहिले जात आहे.

शिकागोचे दोन वेळा महापौर होण्याआधी इमॅन्युएल हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकाळात व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून निवडले गेले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात त्यांनी जपानमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले होते. आता इमॅन्युएल हे २०२८ च्या निवडणुकीत व्हाईस हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून जाण्याची तयारी करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातून कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि पेनसिल्व्हेनियाचे जोश शॅपिरो यांनी लक्ष वेधून घेतले असले तरी इमॅन्युएलही प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.

ट्रम्प यांच्या काळातील भारत-अमेरिका संबंध

जानेवारी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इराण युद्ध सुरू झाल्यापासून भारत रशियाकडून तेल आयात करू शकतो, याची परवानगीही त्यांनी दिली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित व्यापार करार अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. भारतीय तंत्रकुशल मनुष्यबळासाठी अमेरिकेचा एच-१बी व्हिसा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ट्रम्प यांच्या प्रशासनाने एच-१बी व्हिसावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारतातील कुशल मनुष्यबळाची संधी मर्यादित झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ७ मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी आजवर अनेकदा केला आहे. भारताने हे दावे थेट फेटाळून लावले असले तरी ट्रम्प यांनी आपली हेका कायम ठेवला. याउलट पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी ट्रम्प यांचे जवळचे संबंध निर्माण झाले आहेत. इराण युद्धात मध्यस्थी करण्यासाठीही पाकिस्तानच पुढाकार घेत आहे.


ताजा वाद काय?
ट्रम्प यांनी अमेरिकेतील 'बर्थराइट सिटिझनशिप'वरून भारत आणि चीन यांना नरक असे संबोधले. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट शेअर केली. प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने जन्मसिद्ध नागरिकत्वावरुन भारत आणि चीन यांचा उल्लेख 'नरक' असा केला. हा व्हिडीओ ट्रम्प यांनी शेअर केला आहे. यामुळे सॅव्हेजच्या विधानाशी ते सहमत असल्याचे बोलले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांच्या विधानाबद्दल विचारले गेले. यावर जैस्वाल म्हणाले, "आम्ही काही बातम्या पाहिल्या आहेत. मी यावर अधिक भाष्य करणार नाही."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.