बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका तरुण निवासी डॉक्टराने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.
ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. मंदार दाभाडे (वय ३०) असं मृत डॉक्टरचं नाव असून, ते त्वचारोग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मंदार दाभाडे हे अंबाजोगाई शहरातील संत रोहिदासनगर भागात भाड्याच्या घरात राहत होते. डॉ. मंदार यांच्या दिनचर्येनुसार ते रोज पहाटे साडेपाच वाजता जिममध्ये जायचे आणि त्यानंतर आवरून सकाळी ९ ते ९:३० च्या दरम्यान रुग्णालयातील ओपीडीमध्ये (OPD) कर्तव्य बजावण्यासाठी हजर व्हायचे. मात्र, सोमवारी सकाळी ते ना जिममध्ये दिसले, ना ओपीडीत पोहोचले. त्यांना बराच वेळ संपर्क होऊ शकला नाही, रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सहकाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाहिले असता, ही दुर्दैवी घटना समोर आली. त्यांनी गळफास घेतलेला होता.
मृत्यूच्या काही वेळापूर्वी भावाला पाठवला मेसेज
डॉ. मंदार यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आपल्या भावाला एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या मोबाईलचा पासवर्ड भावाला पाठवला. या मेसेजमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, इतकं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं, याचं नेमकं कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नव्हतं.
वैद्यकीय वर्तुळात हळहळ
डॉ. मंदार हे स्वाराती रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून सेवा बजावत होते. अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ असलेल्या डॉक्टरांच्या अशा अचानक जाण्याने रुग्णालयातील कर्मचारी आणि त्यांच्या मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अंबाजोगाई पोलीस अधिक तपास करत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.