सांगली : सध्या देशात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. यात राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघाची संख्या सुमारे ३५० पर्यंत वाढू शकते. तसेच, लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या वाढून सुमारे ६५० होण्याची शक्यता आहे. या पुनर्रचनेनंतर सांगली जिल्ह्यात दीडऐवजी दोन लोकसभा मतदारसंघ, तर आठ ऐवजी नऊ विधानसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतात, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील खरे सांस्कृतिक भवन येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सध्या मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण सुरू असून, मतदार यादी निर्दोष करण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. बीएलओ घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आगामी काळात मतदारसंघ पुनर्रचना होणार असल्याने संघटनात्मक काम अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू होणार असल्याने महिला कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे. कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्याची जबाबदारी पक्षावर आहे.
...तर २०२९ ला मतदान करता येणार नाही
मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सहा महिने सुरू राहणार आहे. तीन महिने मतदार नोंदणीचे काम होईल. त्यानंतरची तीन महिने हरकतीसाठी आहे. सहा महिन्यांनंतर मतदार यादीत नाव नोंदणी बंद केली जाणार आहे. ज्याचे नाव यादीत येणार नाही, त्याला २०२९ ला मतदान करता येणार नाही, असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीत नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.