Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महावितरणची दोन शकले; ९० हजार कोटींच्या डोंगराखाली नव्या कंपन्यांचे भवितव्य काय?

महावितरणची दोन शकले; ९० हजार कोटींच्या डोंगराखाली नव्या कंपन्यांचे भवितव्य काय?


मुंबई: थकीत वीजबिलामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या 'महावितरण'चे विभाजन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता ४५ लाख कृषिपंपधारक ग्राहकांची स्वतंत्र 'एमएसईबी सोलर ॲग्रो पाॅवर लिमिटेड' ही कंपनी अस्तित्वात येणार आहे.

'महावितरण'चे प्रारंभिक समभाग विक्री करून निधी उभारण्याकरिता हे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, ज्या ९० हजार कोटी रुपयांहून अधिक असलेल्या थकबाकीमुळे विभाजनाची वेळ आली त्या थकबाकीचे काय, त्याची वसुली कोण करणार, हे प्रश्न अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे.

राज्यातील वीज ग्राहकांसाठी २००५ पूर्वी राज्य विद्युत महामंडळ कार्यरत होते. मात्र, महामंडळाच्या कामात सुसूत्रता यावी, कार्यक्षमता वाढावी म्हणून २००५ मध्ये 'महावितरण', 'महानिर्मिती' आणि 'महापारेषण' या तीन कंपन्या तयार करण्यात आल्या. आज केवळ २० वर्षांतच 'महावितरण'ची एकूण वीजबिल थकबाकी ९० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. तर 'महावितरण'चे एकूण कर्ज ९० हजार कोटींच्या घरात आहे.
मात्र थकीत वीजबिलाची वसुली होत नसल्याने 'महावितरण'ला वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि महावितरण कंपनीची शेअर बाजारात नोंदणी करून प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारण्याकरिता कृषिपंपधारक ग्राहकांची वेगळी कंपनी तयार करून 'महावितरण'चे 'बॅलन्स शीट' कोरे करण्याचा सरकारचा विचार आहे.

मात्र, सध्या अस्तित्वात असलेली ९० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी कोण वसूल करणार, ती 'महावितरण'च्या खात्यात राहणार की नव्याने अस्तित्वात येणाऱ्या कंपनीच्या डोक्यावर जाणार, असे सवाल वीज क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहेत.

'महावितरण'च्या खासगीकरणासाठी सरकारने कृषिपंपधारकांची वेगळी कंपनी करण्याचा डाव टाकला आहे. कामगारवर्गाला विश्वासात न घेता होत असलेल्या या विभाजनाला आमचा विरोध आहे. तसेच कंपनी वेगळी करून थकबाकी वसूल कशी करणार? भविष्यात थकबाकी वाढणार नसल्याची हमी कोण देईल?
- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

कृषिपंपधारक ग्राहकांची स्वतंत्र वीज कंपनी अस्तित्वात आल्यास 'महावितरण'चे 'बॅलन्सशिट' कोरे होईल. पण सध्या असलेल्या थकबाकीचे काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच 'महावितरण'ने आपली कार्यप्रणाली न सुधारल्यास पुन्हा मागचे दिवस पुढे येऊ शकतात. ग्राहकांची बिल न भरण्याची मानसिकता बदलावी लगेल.

- डाॅ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.