सांगली: ज्यांच्यावर अवैध धंद्यांवर वचक ठेवण्याची जबाबदारी आहे, त्याच राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या ‘सावळ्या गोंधळा’ने सीमा ओलांडली आहे. विभागात कंत्राटी किंवा खासगी व्यक्ती म्हणून शिरलेले काही ‘झिरो’ आज ‘हिरो’ बनले असून, त्यांनी चक्क बायपास रस्त्यावर आपले आलिशान साम्राज्य उभे केले आहे. प्रविण आणि हरी नावाच्या दोन दुव्यांशिवाय या विभागाचे पानही हलत नसल्याने, "हे सरकारी कार्यालय आहे की खासगी दुकान?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
बायपासवर ‘टॅक्स’ वसुलीचे समांतर मुख्यालय!
मिळालेल्या माहितीनुसार, एका बड्या ‘हिरो’ने शहराच्या बायपास रस्त्यावर एक आलिशान कार्यालय थाटले आहे. विशेष म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील बड्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची येथे नियमित उठबस असते. ज्या फाईल्स सरकारी कार्यालयात हलत नाहीत, त्या या खासगी कार्यालयात अवघ्या काही मिनिटांत निकालात निघतात. आर्थिक देवाणघेवाण आणि सेटलमेंटचे हे मुख्य केंद्र बनले असून, येथूनच संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालवला जात असल्याची चर्चा आहे.
प्रविण-हरीची जोडी: मुंबई ते कोल्हापूर ‘उंच भरारी’
या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रविण आणि हरी ही दोन नावे सध्या चांगलीच चर्चेत आहेत. या दोघांच्या संमतीशिवाय विभागात कोणतेही काम मार्गी लागत नाही. सामान्य जनता आणि परवानाधारकांना या दोघांच्या ‘दरबारात’ हजेरी लावल्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. विशेष म्हणजे, या दोघांचे लागेबांधे केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून, कोल्हापूरपासून थेट मुंबईपर्यंत मंत्रालयातील वाटाघाटींपर्यंत त्यांची मजल गेली आहे. या 'उंच भरारी'मुळे प्रामाणिक कर्मचारीही दबावाखाली वावरत आहेत.
नागरिकांची मागणी: या ‘हिरोंचा’ बंदोबस्त कधी होणार?
सरकारी महसूल गोळा करण्याऐवजी स्वतःच्या खिशात ‘माया’ जमा करणाऱ्या या मध्यस्थांमुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. "बायपासवरील त्या कार्यालयात नेमकी कसली खलबतं चालतात? आणि अधिकारी तिथे का हजेरी लावतात?" याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. "राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या या दलालशाहीचा बंदोबस्त वरिष्ठ स्तरावरून तात्काळ व्हायला हवा. अन्यथा, नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होईल." आता या ‘झिरो’ बनलेल्या ‘हिरोंची’ उतरती कळा कधी सुरू होणार आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.