कोल्हापूर :- 'कुटुंबाचा कुलदीपक विझला':,अल्पवयीन मुलाच्या हातात स्पोर्ट्स बाईक देणं पडलं महागात; माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू
मेरी वेदर मैदानाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या दांपत्याच्या मोपेडला कसबा बावड्याकडून भरधाव वेगात आलेल्या स्पोर्टस् बाईकने धडक दिली. या अपघातात जखमी माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचा मुलगा गौतम राजाराम गायकवाड (वय ४०, रा.रमणमळा) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन चालकाला मोटारसायकल देणाऱ्या मामासह पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती. अपघातानंतर उपचार मिळण्यात विलंब झाल्याने जखमीला जीव गमवावा लागला.
याबाबत अधिक माहिती अशी, गौतम गायकवाड आणि त्यांची पत्नी सारिका गायकवाड शुक्रवारी बँकेच्या कामानिमित्त ताराबाई पार्कात गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास ते मोपेडवरून मेरी वेदर मैदानाजवळील रस्ता ओलांडत होते. याचवेळी कसबा बावड्याकडून भरधाव वेगात आलेल्या स्पोर्टस् बाईकचालकाने त्यांच्या मोपेडला जोराची धडक दिली. अपघातात गौतम आणि त्यांची पत्नी काही अंतरावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गौतम विव्हळत पडले होते, तर सारिका यांच्या दोन्ही पायांना इजा झाल्याने त्यादेखील मदतीची याचना करीत होत्या.
अपघातस्थळी जखमी अवस्थेत पडलेल्या गौतम व सारिका यांच्या मदतीसाठी काही नागरिक थांबले होते. काहींनी गौतमला ओळखून कुटूंबियांशी संपर्क साधला. पण, याचवेळी अपघात करणारे दोघेही घटनास्थळावरून निघून गेले. कुटुंबियांसह वाहनधारकांनी जखमींना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. अपघातस्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी उलटला होता. तिथून जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.मात्र, गौतमची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन खासगी रुग्णालयात उपचार मिळेपर्यंत आणखीन अर्धा तासाचा कालावधी गेला. यामुळे अपघातानंतर 'गोल्डन अवर' ओलांडल्याने उपचाराला प्रतिसाद मिळण्यात विलंब होत गेला. यातच रात्री साडेअकराच्या सुमारास गौतम यांचा मृत्यू झाला.
अल्पवयीन चालकाचा मामा ताब्यात
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन चालकावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या ताब्यातील स्पोर्टस् बाईक त्याच्या मामाच्या मालकीची असून, अपघातावेळी तोच मागे बसलेला होता, असे तपासात समोर आले. शाहूपुरी पोलिसांनी वाहन मालक मामाला ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी पालकांवरही गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
कुटुंबाचा आधार हरपला...
गौतम गायकवाड खासगी नोकरी करीत होते. तसेच सकाळी दूध विक्रीचा व्यवसाय सांभाळून कुटुंबाला हातभार लावत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.