दिल्लीतील एका डेंटिस्टने आपल्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा बनवण्याच्या बहाण्याने डॉक्टरने पीडितेला आपल्या घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
चहा बनवण्यासाठी घरी बोलवले अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनूपशहर भागातील रहिवासी असलेली ही तरुणी बुलंदशहरमध्ये आपल्या बहिणीकडे राहून गेल्या तीन वर्षांपासून डॉ. गौरव कुमार यांच्या डेंटल क्लिनिकमध्ये नोकरी करत होती. डॉ. गौरव हे आपल्या घराच्या पुढील भागात क्लिनिक चालवतात आणि मागील भागात कुटुंबासह राहतात. शुक्रवारी (10 एप्रिल) रात्री डॉ. गौरव यांची पत्नी कामासाठी बाहेर गेल्या होत्या आणि क्लिनिकमधील दुसरा कर्मचारीही सुटीवर होता, याचाच फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले.
नातेवाईकांना सांगितला घडलेला प्रकार
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. गौरव याने तरुणीला चहा बनवण्यासाठी घराच्या आत बोलावले. तिथे एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने तरुणीला कोणालाही काही न सांगण्यासाठी धमकावले. मात्र, पीडितेने हिंमत दाखवून घरी परतल्यानंतर सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. संतापलेल्या नातेवाईकांनी तातडीने कोतवाली नगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
डॉक्टर फरार
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई केली. कोतवाली प्रभारी धर्मेंद्र सिंह राठोड यांनी सांगितले की, डॉ. गौरव याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेपासून आरोपी डॉक्टरचा मोबाईल फोन बंद असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.