धार्मिक विधींच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे अटकेत असलेला भोंदू अशोक खरात सध्या पोलिसांकडून कसून होणा-या चौकशीला सामोरा जात असून, या सततच्या चौकशीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर आली आहे.
दि. १८ मार्चपासून पोलिस कोठडीत असलेल्या खरातची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तब्बल ८ ते १० तास चौकशी केली जात आहे. २५ दिवसांच्या या सततच्या चौकशीमुळे तो त्रस्त झाला असून, चौकशीपेक्षा मरण परवडेल अशी भाषा तो करू लागल्याचे सूत्रांनी सांगितले.चौकशीला प्रतिसाद न देणारा खरात जसजशी चौकशी तीव्र झाली, तसतसा खचत गेला. मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझे मरण इथेच आहे, असे तो बोलत असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल असून, एका प्रकरणाची चौकशी संपताच दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू होते. काही आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये त्याने कबुलीजबाब दिल्याची माहिती आहे, मात्र, लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत तो अद्याप मौन बाळगून आहे.
तपासात उघड झाले आहे की, खरात स्वतःला दैवी अवतार असल्याचे भासवून महिलांना जाळ्यात ओढत असे. याशिवाय, श्रीमंत भक्तांना ईडी किंवा आयकर कारवाईची भीती दाखवून पैसे स्वतःकडे ठेवण्यास भाग पाडत असे. या माध्यमातून त्याने गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
पत्नी-पत्नीची तीन बँक खाती सील
एसआयटीने खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या तीन बँक खात्यांना सील ठोकले असून, संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू आहे. नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.