सांगली महापालिका 'ॲक्शन मोड'वर! ३० मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश; संभाव्य पुरासाठी 'वॉर रूम' सज्ज
सांगली आगामी मान्सून आणि सांगलीला बसणारा पुराचा संभाव्य फटका विचारात घेऊन सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त श्रीम. संजीता मोहपात्रा यांनी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेत ३० मे पर्यंत सर्व नालेसफाई आणि २० मे पर्यंत खड्डे बुजवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महानगरपालिकेच्या 'मंगलधाम' आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पार पडलेल्या या बैठकीत आयुक्तांनी 'झिरो कॅज्युअल्टी' (शून्य जीवितहानी) हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सूक्ष्म नियोजन सादर केले.
महापालिकेचा 'पावसाळा प्लॅन' :
स्वच्छता व आरोग्य: शहरातील मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पावसाळ्यात साथरोग रोखण्यासाठी औषध फवारणी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रस्ते व इमारती: २० मे पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.शुद्ध पाणीपुरवठा: पुराच्या काळातही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची तपासणी आणि औषधसाठ्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.विद्युत सुरक्षा: पावसात शॉक लागण्याच्या घटना टाळण्यासाठी विद्युत खांबांचे सर्वेक्षण करून धोकादायक वायर्स आणि पोल दुरुस्त केले जाणार आहेत.
पूरस्थितीसाठी 'वॉर रूम' आणि तंत्रज्ञानाचा वापर
पुराचा धोका निर्माण झाल्यास त्वरित मदतीसाठी मंगलधाम येथे २४x७ 'वॉर रूम' कार्यान्वित केली जाईल. नागरिकांच्या स्थलांतरासाठी निवारा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, बोटींचे नियोजन आणि 'आपत्ती मित्र' ॲपच्या माध्यमातून बचाव कार्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. "प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. आपत्ती काळात नागरिकांना किमान त्रास होईल याची दक्षता घ्या. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."
श्रीम. संजीता मोहपात्रा, आयुक्त, सांगली महापालिका
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील यांच्यासह अग्निशमन, पाणीपुरवठा आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ३१ मे पर्यंत महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.