मुंबई :- मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या प्रशासनाचा निषेध; पगारासाठी स्मशानभूमीत 'प्रेता'सारखं आंदोलन
भाईंदर :- मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच अंत्यविधीची प्रक्रिया करून प्रशासनाविरोधात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असून कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिरा-भाईंदर शहरात जवळपास १६ स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये महापालिकेमार्फत कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हे कर्मचारी स्मशानभूमीची देखरेख करण्यासह अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते साहाय्य करतात. यातील काही कर्मचारी स्थायी स्वरूपात असले तरी बहुतांश कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र मागील तीन महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी हे कर्मचारी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
वारंवार वेतनाची मागणी करूनही कंत्राटदार आणि महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मिरा रोड येथील जॉगर्स पार्कजवळील स्मशानभूमीत एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडत तिरडीवर झोपून निषेध व्यक्त केला. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन लवकरच वेतन देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.