Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संघर्षाशी 'सामना' करणारा शब्द-योद्धा!

संघर्षाशी 'सामना' करणारा शब्द-योद्धा!


पत्रकारितेतील मैत्री म्हणजे केवळ ओळखीचं नातं नसतं, ती असते संघर्षाच्या रणांगणात झडलेली लेखणीची किमया अन् शब्दांची कसरत ! बातम्यांच्या वादळात, दबावाच्या धुक्यात अन् सत्याच्या चक्रव्युहात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे सहकारी म्हणजेच खरी पत्रकार मैत्री ! शब्दांच्या अन् लेखणीच्या लढाईत तयार झालेली ही मैत्री वादळासारखी वेगवान, वज्रासारखी कठोर अन् विश्वासाच्या वटवृक्षासारखी भक्कम असते. कधी बातमीसाठी धावणाऱ्या पावलांत, कधी सत्यासाठी झुंज देणाऱ्या शब्दांत ही मैत्री झळकते. पत्रकारितेच्या प्रवासात ही मैत्री म्हणजे प्रेरणेचा प्रकाश... संघर्षाचा साथीदार तसंच सत्यासाठी लढणाऱ्या योद्धांचं अभेद्य कवच असतं !
​हे सर्व आता आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे परममित्र प्रकाशजी कांबळे यांचा शब्दसोहळा ! मला आता सांगली सोडून जवळजवळ पंचवीस वर्षे झाली, पण आमचा संपर्क मात्र तुटला नाही ! आमची मैत्री एवढी घट्ट आहे, की प्रकाशजी पुण्यात आल्यानंतर किंवा मी सांगलीला गेल्यावर भेट होतेच. भेट शक्य नसेल तरी मोबाईलवर संपर्क असतोच ! एखादी मोठी राजकीय घटना घडली किंवा काही संदर्भ हवा असल्यास हमखासपणे प्रकाशजींची आठवण येते आणि नकळत मोबाईलकडे हात वळतो... शिवाय, त्यांचा ब्लॉग वाचताना, त्यावर प्रतिक्रिया देताना अन् 'गुड मॉर्निंग' करताना रोजचा संपर्क असतोच, तो भाग वेगळा ! सुख-दुःखांची देवाण-घेवाण तर आता नित्यचाच भाग झाला आहे !
​एका छोट्याशा खेड्यात जन्मून संघर्ष पाचवीला पुजला असताना सुद्धा त्याच्याशी 'सामना' देत देत यशाची उत्तुंग भरारी घेणारा हा आमचा मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं शब्द-योद्धाच म्हणावा लागेल ! जिद्द, चिकाटी अन् सचोटीला नेहमी कर्तव्याची जोड देत प्रकाशजींनी अक्षरशः शून्यातून विश्व घडवलं, नव्हे, उभं केलं... अभ्यासू लेखनाच्या जोरावर काळालाही मागं टाकलं ! थोडक्यात, असं म्हणावं वाटतं, की सांगलीच्या पत्रकारितेच्या आकाशात, तसंच कोलांटउड्या मारणाऱ्या या पत्रकारितेच्या दुनियेतील ध्रुवतारा म्हणजे आमचा मित्र ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी कांबळे !

​शब्दांचा चक्रव्यूह रचत, सत्याच्या तलवारीला धार देत अन् निर्भीड पत्रकारितेची पताका उंचावत त्यांनी स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. गावची माती, कौटुंबिक नाती, गावाशी असलेली नाळ अन् स्वकर्तृत्वाची धग या गोष्टींच्या संगमातून उभा राहिलेला हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द आणि तेजस्वी विचारांचा अखंड प्रवाह आहे, हे विसरून चालणार नाही. प्रकाशजींचं व्यक्तिमत्व म्हणजे विचारांचं वादळ अन् स्मरणशक्तीचं अजब समीकरण... मानवी संगणकच म्हणा ना ! शब्दांवर मनस्वी कमांड, अचूक निरीक्षण, क्षणार्धात घटनांचं विश्लेषण करण्याची ताकद यामुळे पत्रकारितेच्या मैदानात त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखणीचा प्रत्येक वार हा सामाजिक किंवा राजकीय प्रश्नांना भिडणारा असतो. त्यामुळेच सांगलीच्या पत्रकारितेत त्यांचे नाव घेतलं की धाडस, प्रामाणिकपणा त्याचप्रमाणे स्पष्टवक्तेपणा अशा प्रकारचं चक्र एकाच वेळी फिरताना दिसतं...
​सुमारे चार दशकांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी पत्रकारितेच्या विश्वात पाऊल टाकलं. कोगनोळीच्या मातीतून भरारी घेतलेला हा तरुण मिरजेच्या भूमीत आला अन् आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा पत्रकारितेतून केला. त्या काळात ना मोठी साधनं होती, ना कोणाचा पाठिंबा... पण, जिद्दीचं चक्र इतक्या वेगाने फिरत होतं की प्रत्येक अडथळा त्याने आपल्या ध्येयाच्या मार्गावरून दूर फेकला. दैनिक 'प्रतिध्वनी' पासून सुरू झालेला हा प्रवास पुढं सांगलीच्या प्रभात मधून दर्शन देत राहिला. एवढंच नव्हे तर पत्रकारितेच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचला. प्रकाशजींची पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नव्हती, तर समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा संघर्षमय प्रवास होता... तो अविरतपणे सुरूच आहे. अभ्यासपूर्ण लेखन, अचूक शब्दांची निवड, अतिशय चपखल वाक्य, त्यांची रोखठोक मांडणी यामुळे त्यांनी पत्रकारितेच्या मैदानात स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलं. त्यांच्या लेखणीतील प्रत्येक वाक्य हे विचारांचं शस्त्र असतं. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी 'प्रकाशझोत' टाकला आणि प्रशासनालाही जागं केलं. त्यांचा प्रत्येक शब्द हा निर्भीड अन् सडेतोड असतो, कारण सध्याच्या पत्रकारितेच्या मायावी दुनियेत तो विकला गेलेला नसतो !

​मी काही काळ मुंबई येथे 'सामना' मध्ये वृत्तसंपादक म्हणून जबाबदारी पार पाडत होतो, त्यावेळी प्रकाशजी सांगलीचे प्रतिनिधी होते. पण, तो एकत्र प्रवास फार काळ टिकला नाही... नंतर तर त्या फक्त आठवणीच राहिल्या ! तत्पूर्वी, नव्वदीच्या दशकात 'केसरी' मधून सुरू झालेली मैत्री मात्र कायम राहिली. आमची वृत्तपत्रं वेगळी, जबाबदाऱ्या वेगळ्या, कदाचित विचारसरणीही वेगळी असली तरी त्याची बंधनं मैत्रीवर कधीच आली नाहीत ! प्रकाशजींचा स्वभाव जितका रोखठोक तितकाच मनमिळाऊ अन् मिश्किल आहे. चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलण्यातला नेमकेपणा, त्याला मिश्किलतेची झालर आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची वृत्ती यामुळे त्यांनी हजारो माणसं जोडली, तीच त्यांची खरी श्रीमंती, तोच खरा ठेवा आणि तीच खरी शिदोरी ! पैसा असो किंवा नसो, परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल... त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही कमी झालं नाही. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन म्हणजे आशावादाचा अखंडपणे वाहणारा झराच ! एखादी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्या कार्यालयात ज्यावेळी चर्चा होत असे, त्यावेळी प्रकाशजींचा आवर्जून उल्लेख व्हायचा. पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या प्रश्नामागे असणारा अभ्यास, तपशील तसंच अचूकता असल्याचं इतर पत्रकारांनाही जाणवायचं. पत्रकारितेच्या मैदानात त्यांनी असे अनेक 'गुगली' टाकलेत, की ज्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही घाम फुटलाय.

​गेल्या अनेक वर्षांपासून ते दैनिक 'सामना' चे सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर पत्रकारांच्या प्रश्नांसाठीही संघर्ष केला. हल्ली फारशी प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बातमीच्या रूपानं ते 'सामना' मधून अनेकदा भेटतात. प्रत्यक्ष भेटीपेक्षा शब्दांची ही भेट मनाला नकळत आपुलकीचा अन् मैत्रीचा ओलावा देऊन जाते. पत्रकारितेचा कधीही गैरवापर न करता त्यांनी सत्याला साथ दिली आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
​प्रकाशजी कांबळे यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे, की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्दीचं चक्र थांबू नये. शून्यातून विश्व घडवणारा हा शब्द-योद्धा आजही पत्रकारितेच्या आकाशात तेजाने झळकतो आहे. प्रकाशजींसारख्या व्यक्तिमत्वामुळे पत्रकारिता जिवंत राहते, सत्याचा आवाज बुलंद राहतो अन् समाजाला दिशा मिळते. प्रकाशजी, तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !
​- संजीव शालगावकर (ज्येष्ठ पत्रकार),
डायरेक्टर, सेन्सेट मीडिया प्रा. लि., पुणे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.