Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा! दिव्यांगांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा! दिव्यांगांचा सरकारला निर्वाणीचा इशारा


नांदेडमध्ये आज मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी रस्त्यावर उतरून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो आंदोलक जमले असून "बदली रद्द करा अन्यथा आंदोलन तीव्र करू" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली का केली, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांसाठी योजनांची अंमलबजावणी वेगाने झाली, त्यामुळे दिव्यांग समाजात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला. त्यामुळेच त्यांच्या बदलीचा निर्णय जाहीर होताच राज्यभरातून नाराजी व्यक्त होत आहे. याआधी मुंबईतील मंत्रालय परिसरातही दिव्यांग बांधवांनी एकत्र येत बदली रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी एकूण 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर त्यापूर्वीच्या आठवड्यात सुमारे 25 अधिकाऱ्यांची फेरबदल करण्यात आली होती. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती देण्यात आली, तर काहींना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.

आज नांदेडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. आंदोलकांचा वाढता आक्रोश पाहता परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बदलीनंतर काही दिवसांतच त्यांच्या आईचे निधन झाले. बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे त्यांच्या मातोश्रींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच त्यांनी आईच्या अस्थींचे विसर्जन नदीत न करता, आपल्यातच शेतात खड्डा खोदून, तिथे वडाचे झाड लावून पूर्ण केले. त्यांनी वृक्षारोपण करून समाजाला सकारात्मक संदेश दिला. सध्या त्यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.