Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचा कायापालट! झोपडपट्टी पुनर्वसनाला वेग; मोजणीसाठी महापौरांकडून एजन्सीची नियुक्ती

सांगलीचा कायापालट! झोपडपट्टी पुनर्वसनाला वेग; मोजणीसाठी महापौरांकडून एजन्सीची नियुक्ती

 पुनर्वसनाचा प्रस्ताव महासभेत मांडणार; महापौर धीरज सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी झोपडपट्ट्यांची अचूक मोजणी करणे आवश्यक असून, त्यासाठी तात्काळ सक्षम एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज दिले.
महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समिती (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष सुजितकुमार काटे, उपाध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र सदामते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
 
 पुनर्वसन प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या मोजणी कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी तत्काळ एजन्सी नेमण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.
 
झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा सविस्तर धोरणात्मक प्रस्ताव तातडीने तयार करून येणाऱ्या महासभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
 
झोपडपट्टीधारकांना त्यांचे हक्काचे आणि दर्जेदार पुनर्वसन मिळावे, यासाठी प्रशासनाने सर्व घटकांशी समन्वय साधून काम करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर म्हणाले की, "शहरातील झोपडपट्टीधारकांच्या हिताला आमचे प्राधान्य आहे. पुनर्वसन प्रक्रिया गतिमान करून नागरिकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक पावले उचलत आहे."

या बैठकीस झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संघटन प्रमुख सूरज पवार, उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक संचालक (नगररचना) हनमंत मारनूर यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.